पुणे

पुणे : बापरे ! चक्क ड्रेनेजमधून जलवाहिनी

अमृता चौगुले

 कोथरूड : पुढारी वृत्तसेवा :  सुरळीत व समांतर पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून वाहिनी टाकण्यात येत असते. वाहिनी टाकण्यासाठी चक्क ड्रेनेज फोडून जलवाहिनी टाकण्याचा प्रताप ठेकेदारांनी केला असल्याचे चित्र कोथरूड भागात पाहावयास मिळाले. ड्रेनेज फोडून पिण्याच्या पाण्याची वाहिनी म्हणजे पालिकेला कर भरून आजार विकत घेण्यासारखे असल्याची चर्चा कोथरूडमध्ये सुरू असल्याची पाहायला मिळाली. कोथरूड गावठाण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. कामामध्ये सदर ठिकाणी मैलापाणी वाहिनीचे ड्रेनेज येत असल्याने ड्रेनेज फोडून जलवाहिनी टाकली होती.  जागरूक नागरिकांनी याबाबत कामाची वर्कऑर्डर आहे, ड्रेनेज फोडण्यासाठी संबंधित अधिकार्‍याला विचारले का, अशी ठेकेदाराला विचारणा केली असता, नाही, असे उत्तर मिळाले.

काम करत असताना संबंधित विभागाचे अधिकारी जागेवर उपस्थित असणे आवश्यक होते, तसेच नागरिकांच्या कररूपी पैशाने अगोदरच विकसित केलेल्या योजनेला धक्का लागणार नाही व नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनी पालिकेच्या वास्तूचे नुकसान झाल्यावर गुन्हे दाखल करण्यात येत असतात. म्हणून नियमानुसार संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

'श्रीमान योगी प्रतिष्ठान'चे अध्यक्ष दुष्यंत मोहोळ म्हणाले, की मुळातच विकासकामे करीत असताना पूर्वी विकसित केलेल्या कामाची तोडफोड न करता काम नक्कीच करता आले असते, पिण्याचे पाणी ही अत्यावश्यक बाब असूनही ड्रेनेज फोडून त्यातून पेयजलवाहिनी टाकणे हे नागरिकांच्या जिवाशी खेळण्यासारखे आहे.  अधिकारी जागेवर नाहीत आणि ठेकेदार काम करीत आहे, त्यामुळे दोघेही दोषी आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आम्ही पाठपुरावा करणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT