भीमाशंकर(ता. खेड); पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र भीमाशंकर येथील यात्रा दि. 18 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. महाशिवरात्र यात्रेनिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीसह 3 ते 4 दिवस तात्पुरत्या स्वरूपात पायरी मार्ग सुरू ठेवावा, अशी सूचना पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली. पोलिस अधीक्षक गोयल यांनी भीमाशंकर मंदिर परिसराला भेट देत पाहणी केली आणि महाशिवरात्र काळात देण्यात येणार्या सोयीसुविधा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
या वेळी त्यांच्यासमवेत आंबेगाव- जुन्नरचे प्रांताधिकारी सारंग कोडलकर, खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, हरेश सूळ, खेडचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे, घोडेगावचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता सुरेश पठाडे, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे व कर्मचारी उपस्थित होते. श्री क्षेत्र भीमाशंकरकडे येणार्या भाविकांच्या पार्किंग समस्येवर संभाव्य उपाययोजना व भाविकांना कोणत्याही प्रकारे अडचणींचा सामना करण्यास पडू नये, यासंदर्भात पोलिस अधीक्षक गोयल यांनी भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट यांच्यासमवेत प्रत्यक्ष स्थळपाहणी करून सूचना केल्या.
या वेळी पार्किंग नंबर 1 ते 5, पायरी मार्ग, व्हीआयपी रस्ता, मंदिर व मंदिर परिसराची पाहणी केली. सध्या मंदिराकडे जाण्यार्या पायरी मार्गाचे काम सुरू असल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला असून, भाविकांना एकमेव असणार्या व्हीआयपी रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. परंतु, हा रस्ता गर्दीच्या दिवशी धोकादायक असल्यामुळे महाशिवरात्री व शिवजयंतीला तात्पुरता पायरी मार्ग सुरू ठेवावा तसेच पायर्यांवर तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेडिंग करावे, भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी योग्य दखल घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.