बारामती: शहरातील कसबा परिसरातील यशवंतनगरी भागात ड्रेनेजचे पाणी थेट भुयारी गटारात न सोडता ते उघड्यावर सोडले जात आहे. परिणामी या परिसरातील काही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये दूषित पाणी शिरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सातत्याने तक्रारी केल्यानंतर रविवारी (दि. 27) मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी येथे भेट देत पाहणी केली. तसेच, आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या. परंतु, त्या कायमस्वरूपी कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
बारामती शहराचा विकासाच्या बाबतीत नावलौकिक असला तरी काही ठिकाणी मात्र पालिका प्रशासनाचे अजिबात लक्ष नसल्याची परिस्थिती आहे. कसबा भागातील यशवंतनगरी परिसरातील नागरिक गेली कित्येक महिने या नरकयातना भोगत आहेत.
परिसरातील बंगले, अपार्टमेंटमधील सांडपाणी भुयारी गटाराला जोडून ते पुढे नेण्याची गरज असताना उघड्यावरच सोडले जात आहे. त्यामुळे हे पाणी लगतच्या काही अपार्टमेंटमध्ये शिरले आहे. अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये सर्वत्र हे दूषित पाणी पसरले आहे. परिणामी नागरिकांना पार्किंगंमध्ये वाहने लावणे, लहान मुलांना तेथे खेळणेही अशक्य बनले आहे.
सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले
थेट पार्किंगच गटार बनल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूषित सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. दुर्गंधीमुळे घरात थांबणेही अशक्य होऊन बसले आहे.
मुख्याधिकार्यांकडून परिसराची पाहणी
नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी रविवारी या परिसराला भेट दिली. पाहणी करत नागरिकांकडून माहिती घेतली. त्यानंतर पालिकेकडून आवश्यक ती यंत्रणा मागवून घेत या परिसरात स्वच्छतेला सुरुवात केली. आम्ही गेली अनेक महिने हा त्रास भोगतो आहोत. पालिकेने आता उपाय सुरू केले आहेत. परंतु, कोणतेही सांडपाणी उघड्यावर सोडले जाणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असल्याचे मत येथील नागरिकांनी व्यक्त केले.