पुणे

पुणे : उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटरच्या अभ्यासासाठी सल्लागार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या वतीने शहरात 21 ठिकाणी उड्डाणपूल आणि ग्रेडसेपरेटर (अंडरपासेस) करण्यात येणार असून, याच्या अभ्यासासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. सल्लागाराच्या अहवालानंतरच ज्या ठिकाणी कमीत कमी अडथळे आहेत, अशा 15 ठिकाणची कामे करण्यासाठी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.शहरातील कोंडी सोडविण्यासाठी शहरातील मोठ्या रस्त्यांवर उड्डाणपूल तसेच ग्रेडसेपरेटर करण्यात येणार आहे. यासोबतच काही ठिकाणी नदीवर तसेच मेट्रो व रेल्वेमार्गावरही उड्डाणपूल उभारण्यात येणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये मेट्रो मार्गिकेवर दुहेरी उड्डाणपुलासोबतच गणेश खिंड रस्त्यावर तीन ग्रेडसेपरेटरचे नियोजन आहे. तसेच, काही ठिकाणी पीपीपीच्या माध्यमातून पुलांची तसेच ग्रेडसेपरेटरच्या कामांनाही मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने दोन हजार कोटी रुपये निधी जाहीर केला आहे. त्यानुषंगाने सध्या सुरू असलेल्या उड्डाणपूल, नदीवरील पुलांच्या कामांसोबतच इतर विविध महापालिका स्तरावर प्राथमिक अभ्यास करण्यात आला आहे.

त्यानुसार सध्या सुरू असलेल्या कामांसोबतच 21 ठिकाणी उड्डाणपूल, नदीवरील पूल, रेल्वे ट्रॅकवरील पूल तसेच अंडरपास तयार करता येतील. या ठिकाणी ही कामे करण्याबाबतचा विस्तृत आराखडा तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

येथे होऊ शकतील उड्डाणपूल / गे्रडसेपरेटर

  • मुंढवा ताडीगुत्ता चौक ते वडगाव शेरी नदीवरील पूल
  • कोरेगाव पार्क ते कल्याणीनगर यांना जोडणारा पूल
  • पानमळा येथून कर्वे रोड व सिंहगड रोडला जोडणारा पूल
  • पुणे स्टेशन व संगमवाडी जोडणारा लुंबिनीनगर येथील पूल
  • संगमवाडी येथील बिंदू माधव ठाकरे चौकात ग्रेडसेपरेटर / उड्डाणपूल
  • येरवडा येथील आंबेडकर चौकात ग्रेडसेपरेटर/ उड्डाणपूल
  • विश्रांतवाडी 509 चौकात ग्रेडसेपरेटर/उड्डाणपूल
  • सोलापूर रस्त्यावर काळूबाई चौकात ग्रेडसेपरेटर/उड्डाणपूल
  • विद्यापीठ चौकात ग्रेडसेपरेटर
  • हरेकृष्ण मंदिर येथे ग्रेडसेपरेटर
  • सिमला ऑफिस चौकात ग्रेडसेपरेटर
  • मुंढवा चौक येथे उड्डाणपूल/ ग्रेडसेपरेटर
  • दांडेकर पूल येथे ग्रेडसेपरेटर / उड्डाणपूल
  • रेल्वे उड्डाणपूल, घोरपडी
  • साधू वासवानी पूल
  • कोरेगाव पार्क
  • ससाणेनगर येथे उड्डाणपूल/ ग्रेडसेपरेटर
  • फुरसुंगी चौक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT