पुणे

भिडेवाडा स्मारक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या : अजित पवार

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या भिडेवाड्याचे स्मारक करताना या स्थळाचे महत्त्व लक्षात घ्या तसेच स्मारक करताना तज्ज्ञांची मते आणि सल्ला घ्या, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत. अजित पवार यांनी शनिवारी सकाळी राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या जागेस भेट दिली, त्या वेळी ते बोलत होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे शहराध्यक्ष दीपक मानकर आदी उपस्थित होते. या वेळी पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरतीही केली.
पवार म्हणाले, भिडेवाडा येथे जागेची मर्यादा लक्षात घेता तज्ज्ञांशी चर्चा करून पुढच्या पिढीला सावित्रीबाईंचे कार्य लक्षात राहावे, या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू झाली, हे कळावे या पद्धतीने सर्व स्मारकाची रचना करण्याचा प्रयत्न आहे. बाहेरून पुरातन वास्तू दिसावी आणि आतील बाजूस विद्यार्थिनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सर्व सुविधा असाव्यात, असा प्रयत्न राहील. वाहनतळासाठी परिसरातील जागेचा उपयोग करता येतो का याबाबतही विचार सुरू आहे.

जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार
महात्मा फुलेवाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासंदर्भात पवार म्हणाले, अडीच एकर जागेवर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले आहे. या ठिकाणी महिलांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुलेवाडा 1993 मध्ये उभारण्यात आला आहे. ही दोन्ही ठिकाणे एकत्र करून विस्तृत स्वरूपाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागेल. यापूर्वी काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT