बांधकाम मजुराचा मृत्यू File Photo
पुणे

सहाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कात्रज भागात घडली. सुरक्षेविषयक उपाययोजना न करता मजुराच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी बांधकाम ठेकेदाराविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. रामू रामसिंग राठोड (वय 40, रा. सुंदरनगर, मांगडेवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. तर, दुर्घटनेस जबाबदार ठरल्याप्रकरणी ठेकेदार महमद तौसिफ आलम (वय 35, रा. सिंहगड कॉलेजजवळ, वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक फौजदार रवींद्र भोसले यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 9 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज भागातील खोपडेनगर परिसरात अंबालिका लॅण्डमार्क कंपनीकडून नर्मदा सिटी एफ-1 गृहप्रकल्पाचे काम करण्यात येत आहे. 9 सप्टेंबर रोजी दुपारी सहाव्या मजल्यावर राठोड काम करीत होता. त्या वेळी लिफ्टसाठी असलेल्या मोकळ्या जागेतून राठोड तोल जाऊन खाली पडला. दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम ठेकेदार आलमने सुरक्षेविषयक उपाययोजना केल्या नव्हत्या. तेथे संरक्षक जाळी बसवली नव्हती. मजुरांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना केल्या नसल्याचे तपासात उघडकीस आले. त्याानंतर बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक शेंडे तपास करीत आहेत

गुन्हा दाखलप्रकरणी खंडणीचा प्रयत्न

या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भीती दाखवून दीड लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामदेव भीमराव घोरपडे (वय 44, रा. बिबवेवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत कात्रज येथील 28 वर्षीय व्यक्तीने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी संबंधित बांधकाम साइटवर व्यवस्थापक म्हणून काम करतात. घोरपडेने खंडणीची मागणी केल्यानंतर त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला होता. त्या वेळी घोरपडेने खंडणीच्या रकमेतील 20 हजार रुपये पंचांसमक्ष स्वीकारताना पोलिसांनी त्याला पकडले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT