पुणे: गेल्या दोन वर्षांपासून वेगाने वाढणार्या आणि चांगला परतावा देणार्या बांधकाम क्षेत्राची भुरळ महिला गुंतवणूकदारांना पडली आहे. गुंतवणुकीसाठी घरांचा पर्याय निवडणार्या महिलांचा टक्का गेल्या दोन वर्षांत 21 वरून 31 वर वाढला आहे. तर, शेअर बाजारातील गुंतवणुकीचा टक्का 20 वरून 2 टक्क्यांवर घसरला आहे.
बांधकाम क्षेत्रातील सल्लागार संस्था असलेल्या अॅनारॉकच्या ताज्या अहवालात या बदलत्या गुंतवणूक पद्धतीवर प्रकाश टाकला आहे. या सर्वेक्षणात नवी दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, चेन्नईसह सात मोठ्या शहरांतील 2,950 आणि अहमदाबाद, जयपूर, कोईम्बतूर, कोची, नागपूरसह इतर शहरांतील 750 अशा 3 हजार 700 महिलांशी संवाद साधण्यात आला.
संस्थेने 2022च्या दुसर्या सहामाहीत केलेल्या सर्वेक्षणानुसार गुंतवणूक म्हणून आणि स्वतःसाठी घर घेणार्या महिलांचे प्रमाण 21 आणि 79 टक्के होते. तर, जुलै ते डिसेंबर 2024मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गुंतवणुकीसाठी घरांचा पर्याय निवडणार्या महिलांचा टक्का 31वर गेला आहे. तर, स्वतःसाठी घर घेणार्या महिलांचे प्रमाण 69 टक्क्यांवर आले आहे.
गेल्यावर्षीच्या दुसर्या सहामाहीत सहभागी झालेल्या सुमारे 70 टक्के महिलांनी रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय असल्याचे सांगितले. तर, 2022सालच्या सर्वेक्षणात हे प्रमाण 65 टक्के होते. कोविडपूर्वी (2019) केलेल्या सर्वेक्षणात 57 टक्के महिलांना रिअल इस्टेट क्षेत्र गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय वाटत होता. गुंतवणुकीसाठी शेअर बाजाराला प्राधान्य देणार्या महिलांचे प्रमाण 2022च्या दुसर्या सहामाहीत 20 टक्के होते. हा टक्का घसरून दोनवर आला आहे.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या महिलांपैकी 52 टक्के जणांनी 90 लाखांवरील सदनिकांमध्ये गुंतवणूक केली आहे. याच श्रेणीतील सदनिका खरेदी करण्याचे प्रमाण 2022मध्ये 47 टक्के होते. तर, 33 टक्के गुंतवणूकदारांनी 90 लाख ते दीड कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करण्यासाठी पसंती दिली आहे. तर, दीड कोटी ते अडीच कोटी रुपयांदरम्यान रक्कम असलेली मालमत्ता खरेदीसाठी 11 टक्के महिलांनी पसंती दिली असून, 8 टक्के महिलांनी अडीच कोटी रुपयांहून अधिक घर खरेदीचा मनोदय सांगितला आहे.
नवीन प्रकल्पातील गुंतवणूक वाढली
नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी 18 टक्के महिलांनी पसंती दिली आहे. हे प्रमाण 2022 मध्ये 10 टक्के होते. तर, तयार घर घेणार्यांचा टक्का गत दोन वर्षांत 48 वरून 29 वर घसरला आहे. याशिवाय सहा महिन्यांत घर ताब्यात मिळण्याची शक्यता असलेल्या प्रकल्पातील गुंतवणूक टक्का 31वर गेला आहे.