नसरापूर(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नसरापूर (ता. भोर) येथील स्मशानभूमीत सुरू असलेल्या नवीन गॅस शवदाहिनी इमारतीचा पाया खचून जागोजागी भगदाड पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराकडून इमारतीचे बांधकाम निकृष्ट होत असल्याचा आरोप येथील ग्रामपंचायत पदाधिकार्यांनी केला आहे. कामाचा दर्जा सुधारला नाही तर काम करू देणार नसल्याचा पवित्रा सदस्यांनी घेतला आहे.
स्मशानभूमीत जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत 1 कोटी 15 लक्ष निधीतून गॅस शवदाहिनी प्रकल्पाचे काम सुरू आहे. यापैकी 30 लाख रुपयांच्या निधीचे इमारत बांधकामाचे काम निकृष्ट होत असल्याचे सांगत उपसरपंच संदीप कदम, माजी उपसरपंच गणेश दळवी, ज्ञानेश्वर झोरे, ग्रामसेवक विजयकुमार कुलकर्णी, सदस्य इरफान मुलाणी, सुधीर वाल्हेकर, नामदेव चव्हाण, संदीप कांबळे यांनी पाहणी करून नाराजी व्यक्त केली.
संदीप कदम यांनी माहिती देताना सांगितले की, या निकृष्ट कामाबाबत सतत बांधकाम विभागाच्या अधिकार्यांना कळविले होते. तरीदेखील त्यांनी कामाची पाहणी करण्यासाठी भेटी न देता दुर्लक्ष केले आहे. कामाचा दर्जा बरोबर नसल्याने अनेक तक्रारी आल्याने सध्या हे काम थांबविण्यात आले असल्याचे गणेश दळवी यांनी सांगितले.
एकाच अवकाळी पावसात जर बांधकाम सुटत असेल तर भविष्यात शेजारील जाणार्या शिवगंगा नदीच्या पुरात या बांधकामाची अवस्था बिकट होण्याची शक्यता इरफान मुलाणी, ज्ञानेश्वर झोरे, सुधीर वाल्हेकर आदींनी वर्तवली. याबाबत तातडीने कामाची पाहणी करण्यासाठी संबंधित अधिकार्यांना सूचना केल्या जाणार असल्याचे बांधकाम विभागाचे अधिकारी संजय वागज यांनी सांगितले.
शवदाहिनी इमारत बांधकाम इस्टीमेटमध्ये डबर काम हे नसताना देखील माझ्या खर्चातून केले आहे. इस्टीमेटची प्रत ग्रामपंचायतकडे दिली आहे. इतर केलेल्या बांधकामाची कोणीही तपासणी करू शकते.
अमित कोंडे, बांधकाम ठेकेदार