पुणे

कात्रज बागेत ‘रेप्टाईल पार्क’ची उभारणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात सरपटणार्‍या प्राण्यांसाठी 'रेप्टाईल पार्क'ची उभारणी केली जात आहे. या पार्कची उभारणी दोन वर्षांत पूर्ण करून ते पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी दिली. या पार्कमध्ये सध्याच्या ठिकाणी असलेले सर्पोद्यान स्थलांतरित करण्यात येणार आहे, तर सर्पोद्यानाच्या जागेवर परदेशी माकडांसाठी खंदक तयार करण्यात येणार आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विलास कानडे, उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. राजकुमार जाधव यांनी प्राणिसंग्रहालयाच्या बदलत्या स्वरूपाची माहिती पत्रकारांना दिली. कोरोना काळात दोन वर्षे प्राणिसंग्रहालय बंद होते. कोरोना आपत्तीनंतर प्राणिसंग्रहालय सुरू केल्यानंतर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात संख्या वाढली आहे. आठवड्याची सुरुवात झाल्यानंतर सोमवार ते शनिवार या कालावधीत 5 ते 9 हजार पर्यटक उद्यानास भेट देतात.

मात्र, रविवारी एका दिवसातच जवळपास 20 ते 25 हजार पर्यटक भेटी देतात. कोरोनापूर्वी पर्यटकांकडून वर्षाला साडेपाच कोटी उत्पन्न मिळत होते. आता हे उत्पन्न दुप्पट झाले आहे. येथील प्राण्यांच्या खाण्यावर वर्षाला दोन ते अडीच कोटी रुपये खर्च होतात, तर प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबरोबरच त्यांच्या देखरेख सुरक्षेसाठी संग्रहालयात महापालिकेचे 100 कर्मचारी दिवसरात्र कार्यरत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

पर्यटकांना अधिकाधिक नवीन वन्यप्राणी पाहण्याची संधी मिळावी, यासाठी देशातील विविध प्राणिसंग्रहालयांतून इतर प्राणी विनिमय धोरणांतर्गत आणण्याबाबत चर्चा सुरू आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात सर्पोद्यान आहे. मात्र, ते अद्ययावत करून नवीन सरपटणारे (रेप्टाईल पार्क) उद्यान तयार करण्यात येणार आहे. हे सरपटणारे उद्यान 15 हजार चौरस मीटरच्या विस्तीर्ण जागेत बांधण्यात येत असून, त्याचे काम सध्या सुरू आहे. येत्या दोन वर्षांत ते पर्यटकांसाठी खुले होणार आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार हे 'रेप्टाईल पार्क' उभारण्यात येत आहे.

प्राण्यांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न
प्राणिसंग्रहालय 130 एकर जागेवर साकारण्यात आले असून, 30 एक तलाव आहेत. या प्राणिसंग्रहालयात विविध प्रकारचे प्राणी आहेत. या प्राण्यांना विविध प्रकारचे खाद्य लागते. हे खाद्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दिले जाते. जनावरांना होत असलेल्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर सर्व खाद्य तपासणी करून दिले जाते.

विविध जाती-प्रजातींचे प्राणी व पक्षी उपलब्ध
सध्या प्राणिसंग्रहालयात सरपटणारे प्राणी, हत्ती, विविध जनावरांसह आशियाई नर-मादी सिंह, पांढरा वाघ, पाच वाघ, बिबट्या, अस्वल, हरीण, काळवीट, माकड, हत्ती इत्यादींचा समावेश होतो. सरपटणार्‍या प्राण्यांमध्ये भारतीय अजगर, कोब—ा, विविध प्रकारचे साप, देशी मगरी आणि तारा कासव यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT