रावणगाव: दौंड तालुक्यातील पूर्व भागातील रावणगाव, खडकी, नंदीदेवी, मळद परिसरातील शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर कांदा पिकास पसंती देऊ लागले आहेत. मात्र, कांदा दरातील चढ-उतारामुळे नुकसान टाळण्यासाठी कांदा साठवणुकीसाठी आता आधुनिक कांदा चाळी उभारणीकडे येथील शेतकरी प्राधान्य देऊ लागला आहे.
रावणगावसह परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील कांदा तसेच रब्बी हंगामातील पाच महिना वाढीच्या, कालावधीच्या कांदा लागवडीस प्राधान्य देऊ लागले आहेत. बाजारातील चढउतार, लहरी हवामान, मशागतीसाठी शेत मजुरांचा तुटवडा, कीटकनाशक फवारणी, कांदा बियाणे- रोपे यांच्या किंमती या अनुषंगाने कांदा पिकास येणारा एकरी खर्च काही हजारांत तर हेक्टरी खर्च लाखात जातो.
या सर्वांवर मात करत दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील कांदा उत्पादक शेतकरी रब्बी आणि खरीप या दोन्ही हंगामात कांदा पीक सातत्याने घेत आहेत. त्यातही विशेषतः पाच महिना कालावधीच्या उन्हाळी कांद्याच्या साठवणुकीसाठी पारंपरिक कुडाच्या कांदा चाळींपेक्षा मोठ्या आकाराच्या अत्याधुनिक कांदा चाळीस पसंती देऊ लागले आहेत.
चाळीसाठी दोन ते तीन लाखांचा खर्च
यासाठी साधारणत: दोन ते तीन लाख रुपयांची गुंतवणूक कांदा उत्पादक शेतकर्यांना करावी लागत आहे. हा साठवणुकीचा कांदा बाजारपेठेतील मागणी आणि भावानुसार विक्रीसाठी पाठवला जातो. दौंड तालुक्यातील मोठे कांदा उत्पादक शेतकरी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे, तर अल्पभूधारक शेतकरी दौंड-केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कांदा विक्रीसाठी पाठवतात. हे सर्व गणित संबंधित बाजारपेठेतील आवक आणि भाव यावर ठरते.
कांदा पिकास सातत्य गरजेचे आहे. बाजारातील चढ-उतार यानुसार कांदा साठवणुकीसाठी शेतकरी मोठ्या आणि कायमस्वरूपी कांदा चाळीस पसंती देऊ लागले आहेत.- संजय रांधवण, प्रगतशील शेतकरी, रावणगाव
शासनाच्या कृषी विभागातर्फे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठ्या कांदा चाळींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. जोडीला जिल्हा बँकेच्या पीक कर्ज त्याचबरोबर बळीराजा कर्ज योजनेचा लाभ कांदा उत्पादक शेतकर्यांना घेता येतो.-अंगद शिंदे, कृषी सहायक, दौंड