पुणे

पुण्यात पत्रकाराच्या खुनाचा कट उघड ; स्वारगेट पोलिसांकडून आरोपींना अटक

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील एका वृत्तपत्राच्या उपनगरीय पत्रकाराची सुपारी देऊन त्याच्या खुनाचा कट रचण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वार्ताहरावर यापूर्वी दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. दुसर्‍या हल्ल्यात तर त्याच्यावर गोळीबारदेखील करण्यात आला होता. यातून तो वाचला. स्वारगेट पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवत दोघाजणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयाने 23 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

प्रथमेश उर्फ शंभू धनंजय (रा. दत्तवाडी) व अभिषेक शिवाजी रोकडे (वय 22, रा. नांदेड गाव) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांच्या चार अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी पकडले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नासह इतर कलमान्वये गुन्हा नोंद आहे. गेल्या महिन्यात (दि. 27 मे) तक्रारदार वार्ताहर यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांना ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर 11 जून रोजी तक्रारदार घराजवळ थांबले असता, दोन दुचाकींवर आलेल्या पाचजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला.

त्या वेळी खाली वाकल्याने ते बचावले होते. त्यांनी तेथून पळ काढत सोसायटीत धाव घेतल्याने हल्लेखोर पसार झाले होते. दोन वेळा हल्ला झाल्याने स्वारगेट पोलिसाकंडून आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. यादरम्यान, आरोपी इंस्टाग्राम तसेच व्हॉट्सअप कॉलिंगद्वारे संपर्कात होते. त्यामुळे त्यांचा शोध घेणे कठीण होते. पोलिसांनी परिसरातील जवळपास सव्वाशे सीसीटीव्ही तपासले. पण काहीच हाती लागले नव्हते. पोलिसांचे पथक गेल्या 15 दिवसांपासून आरोपींच्या मागावर होते.

हे संशयित आरोपी रांजणगाव येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी दोघांना पकडले. चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या चार अल्पवयीन साथीदारांनाही धायरी, नांदेड गाव परिसरामध्ये पहाटेच्या सुमारास सापळा लावून पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींकडून पोलिसांनी एक पिस्तूल, मोबाईल व दुचाकी जप्त केल्या. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर, तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर, प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, अमंलदार मुकुंद तारू, दीपक खेंदाड, शिवदत्ता गायकवाड, संदीप घुले, फिरोज शेख, सोमनाथ कांबळे यांच्या पथकाने केली.

हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT