पुणे; पुढारी वृत्तसेवा: वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळा बंद करण्याला पुणे जिल्हा परिषदेने नवा पर्याय दिला आहे. तो म्हणजे वेल्हे तालुक्यातील सोळा गावांच्या सोळा शाळांच्या एकत्रीकरणाचा. पानशेतमध्ये मोठी इमारत उभारली असून, लवकरच शाळा सुरू होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जास्त मुलांसमवेत शिक्षण घेण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होण्यासाठी देखील मदत होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेला आहे.
पटसंख्या कमी असल्याने दोन शिक्षकांच्या नियुक्तीवर शाळा चालवली जाते. परिणामी, एकाच वर्गखोलीत विविध वर्गांतील विद्यार्थी एकत्र बसून शिक्षण घेत आहेत. पानशेतमध्ये मात्र आता प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्याच वर्गातील विद्यार्थ्यांसमवेत शिक्षण घेता येणार आहे. याशिवाय कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये समूह शिक्षणाचा असलेला फायदा होत नव्हता तो आता होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. शाळा एकत्रीकरणाचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग पानशेतमध्ये राबविला जात आहे.
सोळा शाळांची 'सीएसआर'च्या मदतीने मोठ्या अद्ययावत अशा इमारतीमध्ये एक शाळा पुढील काही दिवसांत सुरू होत आहे. जिल्ह्यातील सुमारे 2964 शाळांमध्ये 1 ते 5 वीच्या वर्गांमध्ये 60 पेक्षा कमी विद्यार्थी असून, त्यांना केवळ दोन शिक्षकांकडून शिकवले जाते. सध्या या 16 शाळांमध्ये 37 शिक्षक कार्यरत आहेत. शाळा एकत्रीकरणातून केवळ 9 शिक्षकांची गरज भासणार आहे. मात्र, विषयतज्ज्ञ म्हणून येथे
12 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी दोन बस असतील. त्यासाठी फोर्स मोटर्सने दोन बस दिल्या आहेत. त्यातील एक बस जिल्हा परिषदेच्या मालकीची असेल, तर दुसरी बस स्थानिक चालकाला देण्यात येणार आहे.
दरम्यान, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर कापावे लागत असल्यास अशा विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून वर्षाकाठी सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. हे अनुदान या बसचालकाला प्रत्येक विद्यार्थ्यापोटी दिले जाणार आहे.
शाळा एकत्रीकरणाला सुरुवातीला पालकांसह शिक्षकांचाही विरोध होता. परंतु, त्याचे फायदे सांगितल्यावर सहमती मिळाली. त्यानुसार पानशेत गावात 12 वर्गखोल्यांची शाळा उभारण्याचे ठरले. पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जागेवरच ही नवीन शाळा इमारत बांधण्यात आली. त्याला जानकीदेवी बजाज फाउंडेशनने सव्वा कोटी रुपयांची सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) मदत केली. सध्याच्या सुट्यांनंतर सोळा शाळांमधील 154 विद्यार्थी पानशेतच्या नव्या शाळेत दाखल होणार आहेत.
– आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.