पुणे

पुणे : शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार करता सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. शहरांमध्ये दोन ते तीन शिफ्टमध्ये शाळा सुरू असतात. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय हा तज्ज्ञ, संस्थाचालक आणि शिक्षकांशी बोलून घेण्यात येईल,' अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी दिली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीतर्फे आयोजित 'शिक्षक संवाद व गुणवंत विद्यार्थी गौरव' कार्यक्रमात ते बोलत होते. आमदार सिद्धार्थ शिरोळे, सोसायटीचे अध्यक्ष विघ्नहरी महाराज देव, कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह प्रा. श्यामकांत देशमुख, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे उपस्थित होते. केसरकर म्हणाले, 'लहान मुलांना झोपेची जास्त आवश्यकता असते. या मुलांसाठी शालेय जीवनातील वर्षे महत्त्वाचा असून, या काळातच त्यांचा मेंदूचा जास्त विकास होतो. मात्र, राज्यात शाळांच्या वेळा सात वाजल्यापासून सुरू होतात.

त्यामुळे मुलांची पुरेशी झोप न होऊन त्यांच्यावर जादा मानसिक ताण येतो. या पार्श्वभूमीवर सकाळच्या टप्प्यातील प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू आहे. याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळले देखील पाहिजे. या दोघांची योग्य सांगड घालण्यासाठी शिक्षणपद्धतीत बदलाची आवश्यकता आहे. नव्या शैक्षणिक धोरणात या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

'बदलत्या काळानुसार राज्याच्या शालेय शिक्षणात आमूलाग्र बदल होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी राज्य पातळीवर सल्लागार समिती किंवा मंडळाची स्थापना करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक गुणवत्ता उत्तम ठेवणार्‍या शाळांना स्वायत्त दर्जा देण्याबाबत राज्य सरकारने विचार करावा,' अशी भूमिका डॉ. एकबोटे यांनी मांडली. शिरोळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

…तर निवडणुकीच्या कामातून सुटका
शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे शिक्षकांना केवळ निवडणूक आणि जनगणनेशी संबंधित कामे देण्यात येणार आहेत. ही कामे देण्यापूर्वीही महसूल विभागात कर्मचार्‍यांची संख्या लक्षात घेण्यात येईल. त्यानंतरच ही कामे देण्यात येतील. त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून, त्यांना योग्य सूचना देण्यात येईल, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. शिक्षकांच्या संघटनेमार्फत शिक्षकांना भेडसावणार्‍या समस्या माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे त्या सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

चांगले निर्णय रद्द होणार नाहीत
पूर्वीच्या शिक्षणमंत्र्यांच्या काळात घेतलेले चांगले निर्णय रद्द केले जाणार नाहीत. याबाबत सर्व अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. जे चांगले आहे ते टिकले पाहिजे, अशी माझी धारणा आहे. याउलट गरज पडली तर सर्वांशी चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT