पुणे

पुणे : कर्तव्यदक्ष… पण आरोग्याकडे दुर्लक्ष! महिलांमध्ये वाढते आजार

अमृता चौगुले

प्रज्ञा केळकर-सिंग

पुणे : बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्व, गर्भाशयाचा आणि स्तनांचा कर्करोग, अ‍ॅनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह अशा आजारांना महिला कमी वयात बळी पडत आहेत. आजारांचे निदान वेळेत न झाल्यास अत्यंत महागडे उपचार घेताना खूप परवड होते. मात्र, ते टाळण्यासाठी आवश्यक आरोग्य तपासण्या आणि आरोग्य विम्याबाबत राज्यातील महिला अनभिज्ञच राहत आहेत. एकीकडे आपल्या संसार आणि कुटुंबीयांच्या सेवेत कर्तव्यदक्ष असणार्‍या महिलांना स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये महिला दिनाला उत्सवी स्वरूप येत असताना महिलांच्या मूळ समस्यांकडे होणारे दुर्लक्ष चिंताजनक आहे. लग्नाचे वाढते वय, आहार-विहाराच्या बदललेल्या सवयी, यामुळे प्रजननक्षमतेशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. याशिवाय, कर्करोगाचे वाढते प्रमाण ही धोक्याची घंटा आहे. किशोरवयीन वयापासून मुलींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज वैद्यकतज्ज्ञांकडून अधोरेखित होत आहे.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने राज्यात 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' हे अभियान राबविण्यात आले असून, त्याअंतर्गत साडेचार कोटी महिलांची तपासणी करण्यात आली आहे. आता प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांमध्ये गर्भवती आणि स्तनदा मातांसाठी विशेष तपासणी अभियान राबविण्यात येणार आहे.

राज्यात महिलांसाठी आरोग्य तपासणीसह जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, महिला नसबंदी, या योजनांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आरोग्य विभागांमार्फत 'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' या विशेष अभियानांतर्गत राज्यात 18 वर्षांवरील महिला, माता, गर्भवती यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.

'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित'
राज्यात अडीच लाखांवर महिलांना मधुमेह राज्यात 4 कोटी 39 लाख 24 हजार 100 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 30 वर्षांवरील 2 लाख 57 हजार 198 महिलांमध्ये मधुमेह, तर 4 लाख 19 हजार 584 लाभार्थ्यांना उच्च रक्तदाबाचे प्राथमिक निदान झाले. तसेच, 33 हजार 977 लाभार्थ्यांना हृदयासंबंधित आजार असल्याचे आढळून आले. 61,729 लाभार्थ्यांना कर्करोगसदृश संशयित लक्षणे आढळून आली. अभियानांतर्गत 27 लाख 97 हजार 394 गर्भवतींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 लाख 18 हजार 169 मातांना उच्च रक्तदाबाची प्राथमिक लक्षणे आढळून आली.

शहरात 10,582 महिलांना उच्च रक्तदाब
अभियानांतर्गत शहरात तीन महिन्यांत 11 लाख 10 हजार 154 महिलांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 10,582 महिलांना उच्च रक्तदाब, 7496 लाभार्थींना मधुमेह, गर्भावस्थेतील उच्च रक्तदाब 608, गर्भावस्थेतील मधुमेह 164, अ‍ॅनेमिया 1053 आणि 58 जणींमध्ये स्तनांच्या कॅन्सरचे निदान झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT