Hanumant Pawar Attack Pune
पुणे : काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना सोमवारी संध्याकाळी मारहाण करण्यात आली. हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी ही मारहाण केली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
सोमवारी पुण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्ता तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केली. पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर दामगुडे आणि सहकाऱ्यांकडून पवार यांना मारहाण करण्यात आली. तुषार दामगुडे यांनी पिस्तुल दाखवल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांंनी केला आहे.
सोमवारी पुढारी न्यूजवरील 'धुरळा' चर्चासत्रात 'शिवरायांचा अवमान, मराठी अस्मिता गपगुमान' या विषयावर चर्चा झाली. यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे हे पुण्यातून सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यावर पुढारी न्यूजच्या कार्यालयाबाहेर हनुमंत पवार आणि तुषार दामगुडे यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादावादीनं हाणामारीचं रुप धारण केले. तुषार दामगुडे आणि त्यांच्यासमवेत आलेल्या तीन ते चार साथीदारांनी हनुमंत पवार यांना मारहाण केली. सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली असून तुषार दामगुडे यांनी आधी हात उगारल्याचे व्हिडिओत दिसते.
हनुमंत पवार काय म्हणाले?
मारहाणीच्या घटनेनंतर हनुमंत पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'कार्यक्रम संपल्यावर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. यादरम्यान गेटबाहेर थांबलेल्या दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मला शिवीगाळ करुन बोलावले आणि तू भाजप- संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो, असा जाब विचारत तुषार दामगुडेंनी मला पिस्तुल दाखवले. 'पुढारी न्यूज'च्या कर्मचाऱ्यांनी मला वाचवलं आणि यानंतर हल्ला करणारे पळून गेले.'
तुषार दामगुडे- हनुमंत पवार यांच्यातील वाद नेमका काय?
या मारहाणीला कारणीभूत ठरली ती काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनवरील चर्चासत्रात झालेली शाब्दिक चकमक. 'काही दिवसांपूर्वी मी आणि तुषार दामगुडे एका चर्चासत्रात सहभागी झाली होतो. या चर्चासत्रात आमच्यात वाद झाला होता, यादरम्यान तुषार दामगुडेंनी आमच्या प्रदेशाध्यक्षांना शिवीगाळ केली होती. मी याला तीव्र शब्दात विरोध दर्शवला होता. आज याच मुद्द्यावरुन त्यांनी पुन्हा मला जाब विचारला. तू हर्षवर्धन सपकाळांची बाजू घेऊन बोलणारा कोण, असं विचारत त्यांनी मला माराहण केली, असा दावा हनुमंत पवार यांनी केला.
तुषार दामगुडे काय म्हणाले?
'नुकत्याच एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान हनुमंत पवार यांनी मला शिवीगाळ केली होती. मी पिस्तुल दाखवले असा आरोप त्यांनी केला. पण ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीये, पोलिसांनी ते तपासावं, सत्य बाहेर येईल,' असं तुषार दामगुडेंनी सांगितले. 'मला नक्षलवाद्यांपासून धोका असल्याने मला पोलीस संरक्षणही आहे. माझ्याकडे पिस्तुलचा परवानादेखील आहे', असं दामगुडेंनी स्पष्ट केले.