nirmala sitharaman 
पुणे

काँग्रेसची गरिबी हटाव मोहीम साठ वर्षांत अयशस्वी: केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची टीका

अमृता चौगुले

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभेचा शुभारंभ हा जेजुरीतील खंडोबा देवाच्या दर्शनाने सुरू झाला आहे. काँग्रेसची सत्तेत असताना मागील साठ वर्षे 'गरिबी हटाव' ही केवळ घोषणा होती. प्रत्यक्षात गरिबी दूर झाली नाही. मग त्यासाठी वापरला गेलेला पैसा कुठे गेला, हा एक प्रश्न आहे. 2014 असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी अनेक हिताच्या योजना आणल्या. केंद्र शासनाच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले.

जेजुरी येथे भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी बैठकीत निर्मला सीतारामन बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या, लोकप्रतिनिधींच्या समस्या अडचणी समजून घेण्यासाठी मी आले आहे. 2014 पासून भाजपा सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविणे हे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. या वेळी प्रास्ताविक भाषणात भाजपाचे नेते जालिंदर कामठे यांनी पुरंदरच्या विकासासाठी आंतरराष्टीय विमानतळ होत असताना येथील जागेचे मालक असणार्‍या शेतकर्‍यांशी शासनाने संवाद साधावा

. शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये, गुंजवणी धरणाचे पाणी लवकर मिळावे, जेजुरी एमआयडीसीचे विस्तारीकरण होऊन रोजगार उपलब्ध व्हावा, सासवड ते कोंढवा चारपदरी रस्ता व्हावा, छत्रपती संभाजीराजे यांचे जन्मस्थळ असणार्‍या पुरंदर किल्ल्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळावा अशा मागण्या करून अजित पवार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना 270 कोटी रुपयांचा निधी बारामतीसाठी नेला, सासवड-जेजुरीसाठी केवळ पाच कोटी निधी मिळाला, ही विषमता आहे, असे सांगितले.

या वेळी आमदार राहुल कुल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, बापूसाहेब भेगडे, आमदार राम शिंदे, आमदार माधुरी मिसाळ, प्रदीप कंद, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, गिरीश जगताप, कांचन कुल, राहुल शेवाळे, सचिन पेशवे, श्रीकांत ताम्हाणे, सरपंच ऋतुजा जाधव, अलका शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अ‍ॅड. दशरथ घोरपडे यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT