पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे छावणी परिषदेची (कॅन्टोन्मेंट बोर्ड) सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे इच्छुक कामाला लागले असून, मतदार यादीत नावे शोधली जात आहेत. मात्र, 2022 मध्ये अद्ययावत केलेल्या मतदार यादीत अनेक मतदारांची नावे वगळली. विशेष निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांचे नाव यादीत नसल्याची बाब समोर आली असून, मतदार यादीत घोळ दिसून येत आहे.
बोर्ड प्रशासनाने संबंधित नावे वगळताना संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना दिलेली नाही, असा आरोप केला जात आहे.
निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवस मतदार नोदणींची संधी देण्यात आली. त्यात आठ वॉर्डांतील सुमारे 1650 मतदारांनी नावनोंदणीसाठी अर्ज केला आहे. दरम्यान, नोंदविलेल्या मतदारांच्या नावावर 8 मार्चपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहेत. आलेले आक्षेप आणि तक्रारींवर 13 व 14 मार्चला सुनावणी होऊन 17 मार्चला बोर्डाचे अध्यक्ष निर्णय जाहीर करणार आहेत, तर कॅन्टोन्मेंटच्या कायद्यानुसार 2022 मध्ये अद्ययावत केलेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
निवडणुकीची अधिसूचना 1 मार्च रोजी प्रसिद्ध झाल्यापासून तीन दिवस मतदार नोंदणीसाठी वेळ देण्यात आला. मात्र, हा कालावधी अपुरा आहे. त्यामुळे वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी मतदारांकडून केली जात आहे. तो देता येणार नाही, असे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाकडून सांगण्यात आले.
भाडेकरूचे नाव यादीत अन् मालकाचे गायब..!
घोरपडी पेठ बाजार परिसरातील अमित कंट्रोलू यांच्या आईने 2015 मध्ये झालेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणूक लढवली होती. ते सुरुवातीपासूनच येथील रहिवासी आहेत. मात्र, प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या भाडेकरूचे नाव मात्र मतदार यादीत समाविष्ट आहे !