पुणे: लोकसभा निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याबाबत न्यायालयाने सुनावण्या घेऊन, पक्षकारांचे म्हणणे ऐकून ईव्हीएम पूर्णतः विश्वसनीय असल्याचा निकाल दिला. निवडणूक प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा, यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्याच्या सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.
एस. चोक्कलिंगम यांच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगाने यशदामध्ये सोमवारी एकदिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती, त्या वेळी ते बोलत होते.
या प्रसंगी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी, भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव कनिष्क कुमार, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्यासह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडचे (बीईएल) अभियंता उपस्थित होते.
चोक्कलिंगम म्हणाले, लोकांच्या ईव्हीएममधील मायक्रो कंट्रोलर चीपबाबत ज्या तक्रारी, शंका आहेत, त्या देखील दूर व्हाव्यात, यासाठी यंत्रणा निर्माण करावी, असे न्यायालयाने भारत निवडणूक आयोगाला निर्देशित केले. त्यादृष्टीने आयोगाने बीईएलच्या साहाय्याने ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बर्न्ट मेमरी, मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणीसाठी तांत्रिक प्रमाणित कार्यपद्धती तयार केली आहे.
निवडणुकीनंतर या चीपमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप करून निकालात बदल (मॅनिप्युलेशन) करण्यात आलेले नाही. याबाबत नागरिकांची खात्री करणे यादृष्टीने या कार्यपद्धतीला महत्त्व आहे. लोकांचा निवडणूक प्रक्रियेवर विश्वास राहावा, यासाठी ही कार्यपद्धती राबवायची आहे. त्यामुळे ही तपासणी व पडताळणी प्रक्रिया व्यवस्थितरीत्या राबविण्याची मोठी जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकार्यांवर आहे. ही नवीन पद्धती असल्याने जिल्हाधिकार्यांनी समजून घ्यावी, यासाठी कार्यशाळेचे आयोजन केल्याचे चोक्कलिंगम यांनी सांगितले.