पुणे

पुणे बंद : बाजारपेठा ठप्प ! महापुरुषांच्या अवमानाचा सर्वधर्मीय शिवप्रेमींकडून निषेध

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील संविधानिक पदावरील तसेच अन्य जबाबदार व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार होत असलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या निषेधार्थ मंगळवारी (दि. 13) शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमुळे मध्यवर्ती भागातील प्रमुख बाजारपेठांसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे चित्र दिसून आले. शहराला भाजीपाला, फुले, फळे व अन्नधान्य पुरविणार्‍या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात बंदमुळे सर्व व्यवहार बंद होते. विभागातील सर्व अडते, व्यापारी, कामगार उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले होते.

त्यामुळे, सोमवारी रात्रीपासूनच बाजारपेठेमध्ये शुकशुकाट पसरला होता. मुख्य बाजारातील श्री छत्रपती शिवाजी महाराज अडते असोसिएशन व श्री छत्रपती शिवाजी कामगार युनियन, फूलबाजारातील अखिल पुणे अडते असोसिएशन, फुलबाजार व्यापारी व अडते संघ, गूळ भुसार बाजारातील दि पूना मर्चंटस् चेंबरच्या वतीने बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांनी बंद पुकारल्यामुळे एरवी गजबजणार्‍या महात्मा मंडई व परिसरातही बंदमुळे शांतता पसरली होती.

पुणे व्यापारी महासंघाने केलेल्या विनंतीनुसार, शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख बाजारपेठ असलेला लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच टिळक रस्त्यावरील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. या खेरीज, सजावटीच्या साहित्यांनी गजबजणारी बोहरी आळी, रविवार पेठेतील भांडी आळी, बुधवार पेठेतील चोळखण आळी, नाना व भवानी पेठ येथील टिंबर मार्केट, अप्पा बळवंत चौक परिसर याखेरीज महिलांच्या खरेदीचे आवडते ठिकाण असलेल्या तुळशीबागेतही दुकानदार वर्गाकडून उत्स्फूर्तपणे दुकाने बंद ठेवण्यात आली होती.  अत्यावश्यक सेवा असलेल्या मेडिकल व दूध विक्री खेरीज बहुतांश दुकानदारांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवत पुकारण्यात आलेल्या बंदला पाठिंबा दिला. विविध संघटनांनी केलेल्या आवाहनानुसार दुपारी तीन पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यानंतर, शहरातील सर्व बाजारपेठा पुन्हा सुरळीत सुरू झाल्याचे चित्र होते.

मार्केट यार्डात 26  गाड्यांमधून शेतमाल दाखल

बंददरम्यान पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात मंगळवारी (दि. 13) 26 गाड्यांमधून शेतमालाची आवक झाली. पुणे विभागासह परराज्यातून फळे, तरकारी व कांदा-बटाट्याच्या 26 गाड्या बाजारात दाखल झाल्या. यामध्ये, नागपूर व औरंगाबाद येथून मोसंबी, अमरावती परिसरातून संत्री, पुणे आणि अहमदनगर भागातून कांदा, केरळ येथून अननस, गुजरात तसेच मध्य प्रदेश येथून लसूण, आग्रा, उत्तर प्रदेश येथून बटाटा, कर्नाटक येथून नारळ व काश्मीर येथून सफरचंदाची आवक झाली. बाजार बंद असल्याने याकाळात खरेदी विक्रीचे व्यवहार झाले नाहीत. बाजारात दाखल झालेला शेतमाल कामगारांअभावी गाडीत राहिला. बंद संपल्यानंतर कामगारांच्या मदतीने संबंधित गाळ्यावर शेतमाल उतरविण्यात आला.

सायंकाळनंतर जनजीवन पुन्हा पूर्वपदावर

शहरातील प्रमुख बाजारपेठांसह दुकाने दुपारी तीनपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन पुणे व्यापारी महासंघातर्फे करण्यात आले होते. त्यानुसार, शहरातील विविध मॉल, दुकाने शटर डाऊन करत बंद ठेवण्यात आली. मुख्य रस्ते वगळता अन्य पेठांमधील कामगार सकाळपासूनच दुकानाबाहेर हजर होते. तर, मुख्य रस्त्यांवरील दुकानातील कर्मचारी दुपारनंतर दुकानाच्या दिशेने रवाना होताना दिसत होते. दुपारी तीन नंतर शहरातील सर्व दुकाने खुली झाली. सायंकाळपर्यंत शहरातील सर्व जनजीवन पूर्वपदावर आले होते.

नियोजनामुळे वाहतूकही सुरळीत

'पुणे बंद'दरम्यान काढण्यात येणार्‍या मोर्चामुळे वाहतूक पोलिसांनी नियोजन केल्यामुळे वाहतूकही सुरळीत सुरू होती. मोर्चा मार्गावर सुरू असलेल्या मोर्चाचा अंदाज घेत पोलिसांकडून वाहनांना प्रवेश देण्यात येत होता. बंदमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळल्याने तसेच मोर्चामुळे वाहनांसाठी पर्यायी मार्ग खुले केल्याने मध्यवर्ती भागासह पेठांमध्ये एरवी दिसणारी गर्दी दुपारपर्यंत गायब झाल्याचे
दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT