आळंदी; पुढारी वृत्तसेवा : लाखो भविकांचे उपस्थितीने दुमदुमलेला इंद्रायणी काठ अन् भाविकांनी फुललेली अलंकापुरी अशा भक्तिमय वातावरणात यंदा कार्तिकी वारी, संजीवनी समाधी सोहळा पार पडला. कोरोनामुळे दोन-तीन वर्षे मर्यादित झालेला सोहळा यंदा मात्र उत्साहात साजरा झाला. कार्तिकी वारी भरल्याने भाविकांनी देखील हजेरी लावली. कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत सोहळा पार पडला.
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 726 व्या संजिवन समाधीदिन सोहळ्याची छबिना मिरवणुकीने बुधवारी (दि. 23) सांगता झाली. दि. 17 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर असा अष्टमी ते अमावस्येदरम्यान हा सोहळा परंपरेनुसार पार पडला. बुधवारी सकाळी भाविकांच्या व फडकर्यांच्या महापूजा माउलींच्या चलपादुकांवर संपन्न झाल्या, रात्री दहा वाजता पालखी छबिण्यासाठी मंदिरातून बाहेर पडली व रात्री एक ते दीड वाजेच्या सुमारास मंदिरात परतली. या वेळी फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.
नदी घाट, प्रदक्षिणा रस्ता, वडगाव रस्ता चौक, नगरपरिषद चौक मार्गे पालखीची नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. टाळ-मृदुंगाचे गजरात, सनई चौघाड्यांच्या निनादात काढण्यात आलेल्या छबिन्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. या वेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त अॅड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजभाऊ आरफळकर, उद्धव चोपदार, बंडातात्या कराडकर, चैतन्य महाराज लोंढे, श्रीनाथ महाराज शिरवळकर, भाऊ महाराज फुरसुंगीकर, देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, श्रीधर सरनाईक, बाळासाहेब उखळीकर, पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब जोंधळे, पृथ्वीराज पाटील, ग्रामस्थ, मानकरी, वारकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.