पारगाव : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात ऊसतोडीमुळे बिबट्यांना लपण जागा राहिली नाही. त्यामुळे बिबटे, बछडे आढळून येत आहेत. त्यामुळे पालकवर्गात चिंता वाढली आहे. मुलांना सकाळ – संध्याकाळी शाळेत ने-आण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, शिंगवे, काठापूर, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे ही गावे बिबट्याप्रवण क्षेत्रात येतात. गेली दीड महिन्यापासून या परिसरात ऊसतोड वेगात सुरू आहे. बिबट्यांची मुख्य लपण जागा उसाचे शेत असते. आता ऊसतोडीमुळे लपण जागा त्यांना राहिलीच नाही. त्यामुळे ते आता नागरिकांच्या सहज दृष्टीस पडत आहेत. या भागातील नागापूर, शिंगवे या गावांमध्ये ऊसतोड सुरू असताना बिबट बछडे आढळून आले होते. यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण दिसून येत आहे. याचा धसका आता या भागातील पालकांनी घेतला आहे. लहान मुलांना सकाळ-संध्याकाळ शाळेत ने-आण करण्यासाठी स्वतः पालक सोबत जाऊ लागले आहेत. वनविभागाने देखील सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
ऊसतोडीमुळे बिबट्यांना लपण जागा राहिली नाही, त्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. अनेक गावांमधील, वाडी-वस्ती, मळ्यांमधील शाळांना जाणारे रस्ते हे उसाच्या शेतांमधून गेले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये भीती पसरते. पालकांनी सकाळ-संध्याकाळ शाळेत ने-आण करताना मुलांसोबत असणे गरजेचे आहे.
शारदा दत्तात्रय राजगुरव, वन्यजीव अभ्यासक, शिंगवे