पुणे

गर्भधारणेतील उच्च रक्तदाबाचा ‘अलार्म’

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या काही वर्षांमध्ये अतिजोखमीच्या गर्भधारणेचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. उच्च रक्तदाबामुळे गर्भधारणेमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता वाढते. भारतात 50 महिलांपैकी किमान 3 ते 4 जणींना गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. त्यामुळे जीवनशैली, आहार, व्यायाम अशा विविध माध्यमांमधून रक्तदाब नियंत्रणात राखणे गरजेचे बनले आहे. बर्‍याच गर्भवती मातांमध्ये प्री-एक्लेम्पसिया म्हणजेच गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाबाची स्थिती निर्माण होते. रक्तदाब वाढल्यामुळे गर्भवती महिलेच्या पायांवर सूज येते आणि वेळीच उपचार न केल्यास गुंतागुंत निर्माण होऊ शकते. आई आणि अर्भकासाठी परिस्थिती धोकादायक ठरू शकते, याकडे प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सरिता पवार यांनी लक्ष वेधले. गर्भधारणेचे वय वाढते तसतसे गर्भवती महिलेला मधुमेह आणि उच्च रक्तदाब तसेच बाळाला डाउन्स सिंड्रोम होण्याचा धोका वाढतो, असेही त्या म्हणाल्या.

गर्भधारणेतील उच्च रक्तदाबामुळे लघवीतून अतिरिक्त प्रथिने जाणे, हात-पाय सुजणे, वजन वाढणे अशा समस्या साधारणपणे वीस आठवड्यांनंतर उद्भवू शकतात. यात माता आणि बालकांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणेच्या काळात महिलांनी काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

रक्तदाबाचा त्रास असलेल्या गर्भवती महिलांनी जीवनसत्त्वे, खनिजे, लोह जास्त प्रमाणात असलेली फळे आणि भाज्यांचे सेवन करावे. पुरेशा प्रमाणात पाणी आणि द्रवपदार्थ घ्यावेत. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत. गर्भवती महिलेच्या शरीरात उच्च रक्तदाब किंवा हायपर टेन्शनची लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.
                                                              – डॉ. गिरिजा वाघ, प्रसूतितज्ज्ञ

SCROLL FOR NEXT