पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: कोरोना महामारी तसेच, संरक्षण विभागाकडून परवानगी मिळण्यास विलंब झाल्याने रेंजहिल्स व खडकी येथील काम अनेक महिने रखडले होते. पिंपरी ते रेंजहिल्स या 12.064 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गिकेवरील अखेरच्या सेगमेंटची जुळवणी रेंजहिल्स येथे सोमवारी (दि.31) करण्यात आली. अडथळ्याची शर्यत पूर्ण करीत अखेर, हा मार्ग पूर्ण झाला.
चिंचवड येथील मदर टेरेसा उड्डाणपुल ते रेंजहिल्सपर्यंतचा 12 किलोमीटर अंतराचा मार्ग उन्नत (एलिव्हेटेड) आहे. रेंजहिल्सच्या पुढे कृषी महाविद्यालयाच्या जागेतून मेट्रो मार्ग भुयारी आहे. तेथून तो मार्ग स्वारगेटपर्यंत आहे. प्रशस्त रस्ते तसेच, कामासाठी कोणताही अडथळा नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी ते दापोडी मार्गावरील कामे वेगात पूर्ण झाली.
मार्गिका सर्वांत प्रथम याच मार्गावर पूर्णपणे तयार झाली. तसेच, 30 डिसेंबर 2019 ला प्रथमच मेट्रो कोच (डब्बे) संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनजवळ मार्गिकेवर चढविण्यात आले. मेट्रोतून पिंपरी ते फुगेवाडी मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (सीएमआरएस) ची सर्वांत प्रथम परवानगी 6 जानेवारी 2022 ला मिळाली. त्यानंतर पुण्याच्या मार्गास ती परवानगी मिळाली.
पिंपरी ते रेंजहिल्सच्या मार्गावर सर्वात प्रथम पिलर 7 ऑक्टोबर 2017 ला कासारवाडीतील शंकरवाडी येथील महादेव मंदिरासमोर उभारण्यात आला.
नाशिक फाटाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टींग यार्डमध्ये मार्गिकेसाठी 3 हजार 934 सेगमेंट तयार करण्यात आले. अखेरचा सेगमेंट सोमवार (दि.31) रेंजहिल्स येथे बसविण्यात आला. या मार्गावर एकूण 451 स्पॅन (दोन पिलरला जोडून दहा सेगमेंट जोडून तयार झालेला भाग) उभारण्यात आले आहेत. कास्टींग यार्डमध्ये पहिला सेगमेंट 29 ऑगस्ट 2017 ला बनविण्यात आला. तर, शेवटचा सेगमेंट 19 ऑक्टोबर 2022 ला तयार झाला. काम संपल्याने कास्टींग यार्ड बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
कास्टींग यार्ड बंद होणार असल्याने रहिवाशी समाधानी
पिंपरी ते रेंजहिल्स या मार्गासाठी सेगमेंटची निर्मिती नाशिक फाटाजवळील पिंपळे गुरव येथील कास्टींग यार्डमध्ये करण्यात आली. तेथे सिमेंट काँक्रीट व खड्डीद्वारे एकूण 3 हजार 934 सेगमेंट तयार करण्यात आले. या यार्डमुळे पिंपळे गुरव व कासारवाडी परिसरातील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात धुळ व मातीचा त्रास होत होता. अनेकांना श्वसनाचे आजार जडले. अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात धूळ व माती साचत होती. तसेच, रस्तेही वारंवार खराब होत होते. येथील काम संपल्याने यार्ड बंद करण्यात येणार असल्याने परिसरातील रहिवाशांनी व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, 'पुढारी'च्या वृत्तामुळे कास्टींग यार्डातून राडारोडा व वाया गेलेला माल पवना नदीत टाकणे बंद करण्यात आले.
संरक्षण विभागाच्या 'ना'मुळे वाहतूक कोंडीची समस्या
पिंपरी ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत मेट्रो मार्गिका व स्टेशनची मागे वेगात पूर्ण झाली. मात्र, संरक्षण विभागाने खडकी व रेंजहिल्स परिसरातील जागा देण्यास मोठा विलंब लावला. त्यामुळे खडकी ते रेंजहिल्सपर्यंतचे काम रखडले होते. तसेच, मेट्रोकडून संथ गतीने काम सुरू होते.काम रखडल्याने वाहन चालकांना खडकी बाजार मार्गे पुण्याकडे जावे लागत आहे. तेथील अरूंद व खड्डेमय रस्ते, रहदारीची बेशिस्ती आणि कोंडीमुळे वाहनचालक अक्षरश : वैतागले आहेत. या नित्याच्या कोंडीतून लवकरात लवकर सुटका व्हावी, अशी अपेक्षा त्रस्त वाहनचालकांकडून व्यक्त केली जात आहे.
संरक्षण विभागाकडून जुलै महिन्यात मिळाली जागा
संरक्षण विभागाच्या अॅम्युनिशन फॅक्टरी, सीएएफव्हीडी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, डिफेन्स इस्टेट, जीओसीएनसी अशा वेगवेगळ्या विभागाकडून जागा ताब्यात घेण्यासाठी महामेट्रोला बरीच कसरत करावी लागली. खडकी पोलिस ठाण्यामागील सुमारे 10 घरांची जागा संरक्षण विभागाकडून जुलै 2022 ला मिळाली. तेथील रहिवाशांचा इतरत्र पुनर्वसन करण्यात आले आहे. परवानगी मिळेपर्यंत दापोडी ते खडकी रेल्वे स्टेशन आणि रेंजहिल्स येथील कामे वेगात पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
पिंपरी ते सिव्हील कोर्ट मार्ग नोव्हेंबरअखेर पूर्ण करणार पिंपरी ते रेंजहिल्स हा मेट्रोचा महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावरचे काम 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर मेट्रोची चाचणी घेऊन त्या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.