बाजार समितीच्या कारभाराची चौकशी पूर्ण; मात्र अहवाल जाहीर होईना Pudhari
पुणे

Pune Bazar Samiti: बाजार समितीच्या कारभाराची चौकशी पूर्ण; मात्र अहवाल जाहीर होईना

काही दिवसांपूर्वी पणन संचालक विकास रसाळ यांनी अहवाल लवकरच सादर करू, असे सांगितले होते.

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासूनच्या कारभाराच्या चौकशी करण्याच्या आदेशास एक वर्षांहून अधिक काळ उलटूनही चौकशीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे. काही दिवसांपूर्वी पणन संचालक विकास रसाळ यांनी अहवाल लवकरच सादर करू, असे सांगितले होते. मात्र, अद्यापही अहवाल जाहीर होत नसल्याने बाजार आवारात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

मागील दोन वर्षांपासून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. तेव्हापासून बाजार आवारात अनेक अनियमित, बेकायदेशीर आणि चुकीच्या पध्दतीने कामे झाल्याचा आरोप करण्यात आला होता. (Latest Pune News)

त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात चौकशी अधिकारी म्हणून मोहन निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली होती. संचालक मंडळ अस्तित्वात आल्यापासून अनेक ठिकाणी बेकायदेशीर टपर्‍या, पार्किंग निविदा, सुरक्षारक्षक निविदा, अतिरिकत दरांच्या निविदा, अनधिकृत बांधकामे, सेस चोरी आदी प्रकरणे घडल्याने ते चौकशी अहवालातून समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, यामध्ये संचालकांच्या कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. अहवालाबाबत पणन संचालक विकास रसाळ काय भूमिका घेतात हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. दरम्यान, अहवालास उशिर हा एकप्रकारे तो दाबण्याचा अथवा बदलण्याच्या हालचालीही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संचालकांवर बरखास्तीची टांगती तलवार?

आमदार आणि नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी देखील बाजार समिती बरखास्तीची मागणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़ त्यामुळे गैरव्यवहार होत असलेल्या विविध घटकांच्या मागणीला बळकटी आली आहे़. त्यामुळे चौकशी अहवाल लवकर येणे अपेक्षित आहे. त्यामुळे, संचालक मंडळावर बरखास्तीची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT