पुणे : पुढारी वृत्तसेवा : जलजीवन मिशन अंतर्गत सर्वात जास्त योजना पुणे जिल्ह्यात सुरू आहेत. प्रत्येक गावामध्ये पेयजलाचा नियमित पुरवठा होण्यासाठी आराखड्यात नमूद केलेल्या उपाययोजनेची विहित वेळेत अंमलबजावणी करावी. जलजीवन मिशनची अंतर्गत करण्यात येणारी कामे मार्च 2024 अखेर पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पच्या नियोजन अधिकारी सुनेत्रा पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, कामे पूर्ण करताना पाणी व कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे. पिण्याच्या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी. वैयक्तिक मालकी असलेल्या जागेचे दानपत्र करून घ्यावे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. कामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. कामाच्या प्रगतीबाबत प्रत्येक आठवड्यात आढावा घ्यावा. वनविभागाची जागा, गायरान, पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वैयक्तिक मालकीच्या जागा व इतर जागांबाबतच्या अडचणीबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जागा हस्तांतरित करून घ्याव्यात, तसेच कामांची गती वाढविण्याच्याही सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या. कार्यकारी अभियंता खताळ यांनी जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रलंबित कामे अधिक वेगाने पूर्ण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
जिल्ह्यात 1 हजार 230 योजना सुरू आहेत. जलजीवन मोहिमेंतर्गत सुरू असलेली सर्वच कामे वेळेत पूर्ण करण्याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. कामाबाबत काही अडचण असल्यास वरिष्ठांना अवगत करावे. पाईपलाईनची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत.
– रमेश चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.