पुणे

मांजरीतील उड्डाणपूल पूर्ण करा; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा आदेश

अमृता चौगुले

मांजरी(पुणे); पुढारी वृत्तसंस्था : 'मांजरी बुद्रुक येथील रेल्वे उड्डाणपूल तसेच सेवा रस्त्यांचे कामे लवकरात लवकर पूर्ण करावे. नागरिक व वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी हा उड्डाणपूल वाहतुकीस खुला करावा,' असे आदेश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रशासनास दिले आहेत. रेल्वे उड्डाणपूल व सेवा रस्त्यांच्या कामांची चव्हाण यांनी नुकतीच पाहणी करून याविषयी आढावा घेतला.

या वेळी ते बोलत होते. भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी आमदार योगेश टिळेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, कार्यकारी अभियंता अमोल पवार, शाखा अभियंता श्रध्दा मोरे, भाजपा शहर सरचिटणीस संदीप लोणकर, उपाध्यक्ष भूषण तुपे आदींसह व नागरिक उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले की, रेल्वे पुलाचे काम आतापर्यंत 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी. याबरोबरच सेवा रस्ते आणि इतर अडचणी लवकरच सोडविण्यात येतील. नवीन रेल्वे उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. योगेश टिळेकर म्हणाले, 'उड्डाणपुलाच्या कामात काही तांत्रिक अडचणी आहेत. त्या जाणून घेण्यासाठी मंत्र्यांना विनंती केली होती. त्यानुसार त्यांनी या कामाची पाहणी करून केली.'

2016 मध्ये त्याचे काम सुरू करण्यात आले. सुरुवातीला दोन पदरी असलेला हा उड्डाणपूल पुढे चारपदरी करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्षात काम होताना पुलाची उंची आणि लांबी वाढली. त्यासाठी काही भूसंपादन राहिले आहे. 12 नागरिकांची 21 गुंठे जमीन संपादित करण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांनी दखल घेऊन वाटाघाटीने यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी अतिक्रमण असून, येत्या आठ दिवसांत ते काढण्यात येईल.

                            -अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

SCROLL FOR NEXT