पुणे; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाकाळात रस्त्यालगत सॅनिटायझेशनचे काम करणार्या व्यक्तीला कारने धडक दिल्याने डोक्यास गंभीर दुखापत झाली. दुखापतीमुळे त्या व्यक्तीला काही समजत नाही, बोलता येत नाही, तसेच तो 'केअर टेकर'शिवाय जगूच शकत नाही, अशा संतुलन गमावलेल्या व्यक्तीला लोकअदालतीत 1 कोटी 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय झाला आहे.
मनोज सर्जेराव कांबळे असे नुकसानभरपाई मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते रावेत येथे एका नामांकित सोसायटीत राहतात. 21 मे 2020 रोजी ते सोसायटीबाहेर सॅनिटायझेशन करीत होते. त्या वेळी सोसायटीतीलच कारने त्यांना धडक दिली. त्यानंतर थेरगाव आणि चिंचवड येथील रुग्णालयांत अनेक उपचार करण्यात आले. त्यासाठी 20 लाख रुपयांहून अधिक खर्च झाला. तरीही त्यांना काहीही समजत नव्हते. त्यामुळे त्यांच्या पत्नी रूपाली यांनी अॅड. पांडुरंग बोबडे आणि अॅड. अतुल गुंजाळ यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्याय प्राधिकरण येथे दावा दाखल केला.
दोन्ही वकिलांनी विविध डॉक्टरांच्या साक्षीही नोंदविल्या. कारमालक आणि एसबीआय इन्शुरन्स कंपनीविरोधातील दाखल दावा मोटार अपघात न्याय प्राधिकरणाचे सदस्य आणि सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांच्या न्यायालयात सुरू होता. हेडाऊ यांनी तडजोड करण्याबाबत सुचविले. त्यानंतर तडजोडीची चर्चा सुरू झाली होती.
या तजोडीसाठी अॅड. पाडुरंग बोबडे, अॅड. अतुल गुंजाळ, एसबीआय इन्शुरन्सचे अधिकारी संदीप जाधव आणि विक्रम रवींद्रनाथन, कायदा सल्लागार अॅड. ऋषिकेश गानू यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. गानू यांना अॅड. राधा टावरी यांनी मदत केली. पीडितेची पत्नी, अधिकारी, वकील यांच्यामध्ये चर्चेच्या 3 ते 4 फेर्या झाल्या होत्या. शनिवारी लोकअदालतीमध्ये 1 कोटी 20 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय सुधीरकुमार बुक्के आणि अॅड. सुरेंद्र दातार यांच्या पॅनेलने घेतला.