पुणे; पुढारी वृत्तसेवा : आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईलवर मेसेज करून पाच लाख रुपयांची खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक दीपक धोंडीबा मिसाळ (वय 56, रा. फेअर रोड, गोळीबार मैदान, कॅम्प, पुणे) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बिबवेवाडी पोलिसांनी इम्रान समीर शेख (रा. विकासनगर, घोरपडी गाव, पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार 18 ते 23 सप्टेंबर यादरम्यान घडला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली. फिर्यादी दीपक मिसाळ यांचा मोबाईल तसेच आमदार माधुरी मिसाळ यांच्या जनसंपर्कासाठी असलेल्या मोबाईलवर आरोपीने मेसेज केले. त्याने कधी 2 लाख, कधी 3 लाख, तर कधी 5 लाख रुपयांची खंडणी मागणारे मेसेज केले.
सुरुवातीला त्यांनी अशा मेसेजकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर याव्यतिरिक्त आणखी एका मोबाईल क्रमांकावर त्याने पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर दीपक मिसाळ यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार आता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनसंपर्कासाठी असलेल्या क्रमांकावर पाठविला संदेश
बिबवेवाडी पोलिस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यात आमदार माधुरी मिसाळ यांचे दीर दीपक मिसाळ यांना खंडणीची मागणी करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यासाठी आमदार माधुरी मिसाळ यांचा जनसंपर्कासाठी असणारा मोबाईल नंबर वापरण्यात आला आहे. याबाबतचा गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले.