पुणे; पुढारी वृत्तसेवा : बंजारा तांडा सांस्कृतिक एकता संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बंजारा गौरव पुरस्कार व चर्चा सत्र- 2022 चे आयोजन वाकड येथे संतोष पवार आणि प्रिया पवार यांच्या प्रयत्नाने करण्यात आले होते. 'बंजारा अभिनव के नए पर्व की शुरुवात' या उद्घोषणेने सामाजिक स्तर व विकास होण्यासाठी सर्व बंजारा समाज एकत्र व्यासपीठावर आला होता. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. त्यानंतर बंजारा तांडा सांस्कृतिक एकता संघ या चळवळीच्या लोगोचे अनावरण झाले.
उल्लेखनीय कार्य करणार्यांचा सत्कार बंजारा समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्या मान्यवरांचा यावेळी बंजारा समाज गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नवी दिल्ली येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय सचिव गौरव गौतम, बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज, राष्ट्रपती यांचे अतिरिक्त खासगी सचिव राजीव पाठक, माजी न्यायाधीश एन. के. चव्हाण, माजी उपसंचालक माहिती व जनसंपर्क कार्यालय, पुणे, मोहन राठोड, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख, ससून रुग्णालय डॉ. संयोगिता नाईक, गोपालन अनिष आचार्य, बंजारा तांडा सांस्कृतिक एकता संघ अध्यक्ष संतोष पवार, उपाध्यक्ष योगेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार यांनी भाषणात सांगितले की, बंजारा समाज हा कष्टकरी व अतिशय गरीब व मेहनतीने पुढे जात आहे. मात्र, आणखी पुढे जाण्यासाठी शिक्षण व आपल्या बंजारा तांड्यामधील एकजूट व शिक्षित करण्यासाठी प्रयत्न होण्याची व त्यासाठी सर्व बंजारा समाजाची गणना होण्याची गरज आहे.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांतील यशस्वी पुरस्कार्थी अॅड. रमेश राठोड, युवराज आडे, गायक जगदीश चव्हाण, राज चव्हाण, उमेश जाधव, कविता चव्हाण, रमेश चव्हाण, युवराज पवार, सुबोध पवार, डॉ. कुणाल जाधव यांना शाल श्रीफळ, पुणेरी पगडी, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. समाजातील तळागाळात जाऊन काम करणारे सामाजिक कार्यकर्ते यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समस्त बंजारा समाज युवा कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभले, रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन, तर अमोल पवार यांनी आभार मानले.