पुणे

पावसाळ्याच्या तोंडावर रंगीबेरंगी रेनकोटने सजली बाजारपेठ

अमृता चौगुले

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

पावसाळ्याच्या सुरुवातीला रेनकोटच्या खरेदीसाठी गर्दी होत असते. बाजारात रेनकोट विक्रीसाठी आल्याने लवकरच पावसाळा सुरू होणार, याची चाहूल लागली आहे. बाजारात रेनकोट विक्रीसाठी विक्रेते ग्राहकांची प्रतीक्षा करीत आहेत. या वर्षी उन्हाचा कडाका कमी न झाल्याने मे महिना संपत आला तरी रेनकोट खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.

मे महिना संपत आला तरी उन्हाचा कडाका काहीसा कमी होत आहे. गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत मे महिन्याच्या शेवटी तापमानात 2 ते 3 अंश कमी आहे. मान्सूनचे आगमन लांबणीवर पडत असल्याने रेनकोट खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे विक्रेते रेनकोट विकण्यासाठी ग्राहकांची वाट पाहत आहे.

बाजारात प्लास्टिक रेनकोटपासून ते थंडी व पावसाळा अशा दोन्ही वापरासाठी उपयुक्त रेनकोट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच लहान मुलांना आकर्षित करणारे कार्टूनचे डिझाईन असणारे रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत.

ग्राहकांची प्रतीक्षा

मान्सून कधी येणार, याबाबत अनिश्चितता असल्याने आणि उन्हाचा तडाखा अद्याप कमी न झाल्याने रेनकोट खरेदीसाठी ग्राहक उत्सुक नाहीत. गेले दोन वर्ष निर्बंध आणि ग्राहक जास्त करून घराबाहेर न पडल्याने विक्रेते अडचणीत होते. यंदा उन्हाचा तडाखा अद्याप कमी न झाल्याने रेनकोटला ग्राहकांकडून मागणी नाही.

ऑनलाइन खरेदीचा परिणाम

गेल्या दोन वर्षांत ग्राहक ऑनलाइन खरेदीकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. त्यामुळे ऑनलाइन खरेदीचा फटका दुकानदारांना बसला आहे. ऑनलाईन साईटवर रोज विविध ऑफर्स उपलब्ध असतात. त्या ऑफर्स ग्राहकांना आकर्षित करतात.

कोरोना महामारीत 2 वर्षे गेली त्याचा परिणाम व्यवसायावर झाला आहे. यंदा मे महिना संपत आला तरी अद्याप रेनकोट खरेदी झाली नाही. पाऊस सुरू होईपर्यंत ग्राहक बाजारात येणार नाहीत, असे दिसत आहे.

                                                     – राहुल पांचाळ, विक्रेते

SCROLL FOR NEXT