पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर शिष्यवृत्ती अर्जांची पूर्ण छाननी करूनच संबंधित अर्ज सहसंचालक कार्यालयात पाठवावेत, असे स्पष्ट निर्देश विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी संलग्न महाविद्यालयांच्या प्राचार्यांना दिले आहेत.
डॉ. रासवे यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्या ऑनलाइन अर्जाची पडताळणी महाविद्यालय स्तरावरून करण्याबाबत वेळोवेळी परिपत्रकाद्वारे सूचना देण्यात येतात, तसेच सहसंचालक कार्यालयामार्फत व्हॉट्सअॅपवर जिल्हानिहाय ग्रुपमध्ये वारंवार सूचनांद्वारे कळविण्यात येते.
तरीही कोणत्याही प्रकारची तपासणी वा छाननी न करताच महाविद्यालये शिष्यवृत्ती अर्ज जसेच्या तसेच सहसंचालक कार्यालय स्तरावर पाठवत आहेत. सहसंचालक स्तरावर पाठविलेल्या अर्जांमध्ये अनेक त्रुटी आढळून येत आहेत.
त्यामुळे सर्व महाविद्यालयांतील नोडल अधिकार्यांनी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जातील सर्व बाबींची छाननी करूनच अर्ज सहसंचालक स्तरावर पाठवावे अन्यथा सहसंचालक कार्यालयाकडून नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, तसेच संबंधित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर त्याचा परिणाम झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयांची राहणार असल्याचा इशारा विद्यापीठातर्फे संलग्न महाविद्यालयांना देण्यात आला आहे.