पुणे

पिंपरी : महाविद्यालय परिसरात टवाळखोरांचा त्रास, पालकांमध्ये भीतीचे वातावरण; पोलिसांच्या हस्तक्षेपाची गरज

अमृता चौगुले

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: शहरातील माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय आणि महाविद्यालयांच्या परिसरात टवाळखोर तरुणांचा उपद्रव वाढला आहे. शाळा, महाविद्यालय भरताना आणि सुटण्याच्या वेळी परिसरात जास्त गर्दी दिसून येते. शिट्ट्या वाजवणे, गाणे म्हणणे किंवा भररस्त्यात फोटोग्राफी करणे, असे प्रकार टवाळखोर तरुण करताना दिसतात. त्यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्यांविषयी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे; तसेच एकट्या मुलीला शाळेत किंवा महाविद्यालयात कसे पाठवायचे, असा प्रश्न पालकवर्गात निर्माण झाला आहे.

शाळा, महाविद्यालय परिसरात हे टवाळखोर टोळक्याने उभे राहून जोरजोरात हसणे, शिट्टी वाजवणे, दुचाकी गाड्या भररस्त्यातच आडव्या लावून बसून राहणे, गेटवरील सुरक्षारक्षकांना धमकावणे, मुलींची छेड काढणे असे अनेक प्रकार घडताना दिसत आहेत. कॉलेज किंवा शाळा सुटण्याच्या वेळी किंवा भरण्याची वेळी हे टवाळखोर उभे राहतात. पोलिसांकडून शहरामध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथक स्थापन केलेले आहे; परंतु हे पथकच सध्या दिसून येत नसल्याचे बोलले जात आहे.

शाळा, महाविद्यालयांनी सुरक्षारक्षक नेमावेत

शाळा, महाविद्यालयातील वातावरण मुलींच्या सुरक्षिततेसाठी अनुकूल असले पाहिजे. प्रत्येक शाळा, महाविद्यालयाच्या बाहेर सुरक्षारक्षक असणे गरजेचे आहे. पालकांमध्ये भीती निर्माण होणार नाही, असे विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे.

  • तरुण विनाकारण भटकताना आढळल्यास त्यांना पोलिसांनी हटकणे गरजेचे आहे.
  • शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोरांना मज्जाव करायला हवा.
  • शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त असणे गरजेचे.
  • बेशिस्त वर्तन करणार्‍या तरुणांना समज द्यायला हवी.
  • दामिनी पथकाकडूनही मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्यायला हवे.

महाविद्यालयामध्ये शिस्तपालन समिती गठित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांकडूनदेखील महाविद्यालयाच्या बाहेर गस्त घालण्यात येते. महाविद्यालयाने सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. तरुणांकडून चुकीचा प्रकार उघडकीस आल्यास त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येते.
– डॉ. रणजित पाटील, प्राचार्य, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, पिंपरी.

SCROLL FOR NEXT