पुणे : महापालिकेच्या कचर्याच्या डंपरखाली सापडून एका महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. एकता भरत पटेल ( वय 23, रा. विद्यानगर, पिंपळे गुरव) असे तरुणीचे नाव आहे. मंगळवारी (दि.27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास कॉमर झोनकडे जाणार्या रस्त्यावर छत्रपती शाहू महाराज चौक परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी, डंपरचालक त्र्यंबक शेरखाने याला (वय 38, रा. औंध कॅम्प) याला विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News Update)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता ही मराठवाडा मित्रमंडळ लोहगाव येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. मंगळवारी दुपारी ती मोपेड दुचाकीवरून कॉमर झोनकडे जाणार्या रस्त्याने निघाली होती. छत्रपती शाहू महाराज चौकासमोरील बाजूस डंपरचा आणि तिचा अपघात झाला. त्या वेळी डंपरचे पाठीमागील चाक तिच्या डोक्यावरून गेले. अपघातात गंभीर जखमी झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला होता. एकताच्या निधनामुळे तिच्या कुटुंबीयांना व मित्र परिवाराला कमालीचा धक्का बसला आहे. अपघाताची माहिती समजताच तिच्या मित्र-मैत्रिणींनी ससून रुग्णालयात धाव घेतली.