पुणे

पुणे : सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त; नायजेरीयन तरुणाला अटक

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील उंड्री परिसरात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक एकने नायजेरीयन तरुणाकडून तब्बल सव्वादोन कोटींचे कोकेन जप्त केले आहे. कोकेन विक्रीसाठी आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेने ही गेल्या काही वर्षांतील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे दिसते. फॉलरीन अब्दुलअझीज अन्डोई (50, रा. उंड्री. मूळ. रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

शहरात अमली पदार्थ तस्करीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेच्या पथकाकडून गस्त घालण्यात येत आहे. याबाबतच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अंमली पदार्थविरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी एक संशयित नायजेरियन उंड्री-मंतरवाडी रस्ता परिसरात कोकेन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा रचून अन्डोई याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता कारमध्ये तब्बल 1 किलो 81 ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याची बाजारात 2 कोटी 16 लाख 20 हजार एवढी किंमत आहे. त्याच्या ताब्यातून कोकेन, मोबाईल, कार असा तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जाणकर, लक्ष्मण ढेंगळे, अंमलदार प्रविण उत्तेकर, पांडुरंग पवार, मनोजकुमार साळुंके, विशाल दळवी, संदीप शिर्के, सुजित वाडेकर, राहुल जोशी, विशाल शिंदे, सचिन माळवे, संदेश काकडे, रेहाना शेख, योगेश मोहीते यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

रेकॉर्डवरील तस्कर…
अ‍ॅन्डोई हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो 2000 मध्ये कपड्यांचा व्यवसाय करण्यासाठी भारतात आला आहे. सुरुवातीला मुंबईत तो राहत होता. त्यानंतर अमली पदार्थाची तस्करी करू लागला. त्याच्यावर यापूर्वी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच, कस्टम विभागाने त्याला 2014 मध्ये एकदा अटक केली होती. त्यानंतर 2014 मध्ये पुणे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. तेव्हापासून तो कारागृहात होता. त्यानंतर नुकताच तो जामिनावर बाहेर आला असून, त्याने पुन्हा अंमली पदार्थाची तस्करी सुरू केली होती. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेकडून रेकॉर्डवरील अमली पदार्थ तस्करांची माहिती घेऊन कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी शहरातील सर्व तस्करांची कुंडली तयार करण्यात आली आहे. नागरिकांनादेखील आवाहन आहे, अमली पदार्थाची विक्री होत असल्याची माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा. त्यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल.
                                                         – रामनाथ पोकळे,
                                                 अपर पोलिस आयुक्त गुन्हे

SCROLL FOR NEXT