लोणी काळभोर: यशवंत सहकारी साखर कारखाना थेऊर (ता. हवेली) येथील कामकाजातील गंभीर गैरव्यवहार, मनमानी व बेकायदेशीर निर्णयांविरोधात ‘यशवंत बचाव कृती समिती’च्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील तसेच साखर आयुक्त यांना निवेदन देऊन तात्काळ चौकशी व कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन कृति समितिचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी दिले.
यशवंत बचाव कृती समितीचे अध्यक्ष विकास लवांडे, सचिव लोकेश कानकाटे आणि सदस्य राजेंद्र चौधरी यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन 2011 पासून कारखान्यावर नियुक्त करण्यात आलेले प्रशासक, बँकेचे अवसायक व विद्यमान संचालक मंडळ यांनी आपले कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडले नाही. त्यामुळे संस्थेचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत पोहचला आहे. (Latest Pune News)
यशवंत कारखान्याबाबत संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात दाखल असून रिट पिटीशन क्र. 5270/2025 अंतर्गत सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेला बाधा येणार नाही, याची दक्षता घेऊन योग्य पद्धतीने सर्व पुरावे व चौकशी अहवालांच्या आधारे कठोर कार्यवाही करण्याची विनंती कृती समितीने केली आहे. या निवेदनात कृती समितीने नमूद केले आहे की, कारखान्याच्या आर्थिक दिवाळखोरीस जबाबदार व्यक्तींना जबाबदार धरून, कायद्याच्या चौकटीत राहून, सभासदांचे हित जपले जावे व कारखान्याला नवसंजीवनी मिळावी, ही आमची प्राथमिक मागणी आहे.
गंभीर आरोप आणि पुढे आलेले मुद्दे
सन 2011 पासून कारखान्यावर नियंत्रण असलेल्या अधिकार्यांनी नियमबाह्य पद्धतीने कार्यभार स्वीकारल्याचा आरोप.
कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान, तसेच बिनधास्त आर्थिक निर्णय.
शासकीय लेखा परीक्षणात संशयास्पद व्यवहार; प्रत्यक्ष संपत्तीची तपासणी न करता अहवाल सादर केल्याचा दावा.
विद्यमान संचालक मंडळाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला थेट जमीन विक्री करण्याचा केलेला प्रयत्न हा सभासदांना विश्वासात न घेता आणि जाहीर टेंडर प्रक्रिया न करता केल्याचा आरोप.
सहकारी संस्था कायदा कलम 32 अंतर्गत कारवाई करून संचालक मंडळाची तत्काळ बरखास्ती करण्याची मागणी.