पुणे : ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात माझा काय संबंध, मला त्यात का ओढता? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केला. बेगाने शादीमे अब्दुला दिवाना अशी माझी अवस्था करुन घ्यायची नाही असे ते म्हणाले.
एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी शहरातील सीओईपी महाविद्यालयात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांनी त्यांना विविध विषयावर बोलते केले. उध्दव आणि राज ठाकरे यांची युती, संजय राऊत यांचे विधान, वैशाली हगवणे प्रकरणावरील विचारलेल्या प्रश्नांवर त्यांनी थोडक्यात पण तिखट प्रतिक्रिया दिल्या.
फडणवीस म्हणाले, ठाकरे बंधु एकत्र येण्याची उत्सुकता फक्त प्रसार माध्यमांनाच जास्त आहे. तो त्यांचा अंतर्गंत प्रश्न आहे. त्यात मला का ओढता. ते एकत्र येतील नाहीतर चर्चेचे नुसते पंतग उडवत राहतील. मला बेगाना शादीमे अब्दुल्ला दिवाना व्हायचे नाही. असे सांगत या विषयावर सविस्तर बोलणे टाळले. तसेच संजय राऊत काय बोलतात याकडे मी गांभिर्याने पहात नाही. मला जरा माझ्या लेव्हलचे प्रश्न विचारा असा टोलाही त्यांनी लगावला.
तसेच वैशाली हगवणे प्रकरणात कोणाचीच गय केली जाणार नाही. मग दोषी कोणत्याही पक्षातले असो असे स्पष्टीकरण त्यांनी एका प्रश्नावर दिले. पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी बाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल.