Harshwardhan Sapkal on Devendra Fadnavis
पुणे: “देवेंद्र फडणवीस नागपूरचे रहिवासी असल्याने त्यांच्यापर्यंत रेशीमबागेतील वारे लवकर पोहोचतात. तिथूनच संदेश गेले आहेत की मोदी ७५ नंतर राजीनामा देतील. या चर्चांची माहिती फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळेच फडणवीस यांना रात्रीच नव्हे तर भर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्नं पडू लागली आहेत” अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस देशभरात मोठ्या उत्साहात साजरा झाला. मात्र मोदी ७५ वर्षांचे पूर्ण झाल्यानंतर निवृत्ती घेतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यानंतर भाजपकडून पुढील पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चेला उधाण आलेले असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघात आयोजित वार्तालापात वरील गौप्यस्फोट केला आहे. (Latest Pune News)
सपकाळ म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा ही २०१४ -१९ मध्ये मुख्यमंत्री असताना चांगली होती. मात्र, ते आता बदलले आहेत. हिंदी भाषिक प्रांतात आपली पकड मजबूत करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात हिंदीची सक्ती केली. हिंदी भाषिक मतदारांना खूश करण्यासाठी हे पाऊल उचलले. त्यामुळेच आता त्यांना रात्रीच नव्हे तर भर दिवसा देखील पंतप्रधान होण्याची स्वप्नं पडू लागली आहेत,” अशी उपरोधिक टीका देखील सपकाळ यांनी केली.
पंतप्रधान पदासाठी 'कंबोज'ला गडगंज करण्याची जबाबदारी!
नरेंद्र मोदी यांनी दोन राष्ट्रीय उद्योगपतींना गडगंज केले. त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस हे कंबोज या व्यक्तीला प्रचंड संसाधन उपलब्ध करून देत आहेत. दिल्लीश्वराच्या आदेशाने मुंबईतील बड्या प्रकल्पांचे वाटप अडाणी यांच्या घशात टाकण्यात आले. मात्र उर्वरित मुंबई कंबोज यांना देण्याची प्रक्रिया फडणवीस यांनी सुरू केली आहे. एवढा साठा त्यांच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीसाठीच जमा केला जात आहे,” अशी टीका देखील सपकाळ यांनी केली.
'संघाचा आदर्श हिटलर'
सपकाळ यांनी या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्लाबोल केला. “संघाचा खरा आदर्श हिटलर आहे. समता नाकारणारी मनुस्मृती त्यांना प्रिय आहे. तर काँग्रेस करुणा आणि समतेच्या विचारांवर चालते. वैचारिक स्तरावर संघाला सातत्याने विरोध करणारा देशातील एकमेव पक्ष म्हणजे काँग्रेसच आहे,” असा दावा सपकाळ यांनी केला.