पुणे: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ‘तुमचे शिष्टमंडळ असेल, तर चर्चा करू,’ असे सांगितले. ‘मात्र, चर्चा करायलाच कोणीच नसेल, तर ती कोणाशी करायची, हा प्रश्न आहे. माईकवर चर्चा करा,’ असे सांगितले जाते. मात्र, ‘माईकवर चर्चा होते का?’ असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाबाबत उपस्थित केला.
’त्यांच्याकडून काही सूचना आल्या आहेत. त्यावर आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी एक निवेदन दिले आहे, त्यातून काही मार्ग निघतो का ते पाहत आहोत. मराठा आरक्षणाबाबत सरकार आडमुठी भूमिका घेत नाही किंवा अहंकार धरत नाही. सरकार मार्ग काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. चर्चा करण्यासाठी कोणी पुढे आल्यास मार्ग लवकर निघेल,’ असेही त्यांनी यावेळी सांगितले. (Latest Pune News)
नारायण पेठेतील वर्तक बाग येथील मेट्रोच्या पादचारी पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप कांबळे आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, प्रवासात असल्याने नेमके आंदोलनाबाबत न्यायालयाने काय म्हटले हे ऐकले नाही. आंदोलनासाठी काही अटी-शर्ती टाकून परवानगी देण्यात आली होती. न्यायालयाच्या निर्देशांचे पालन प्रशासनाला करावेच लागते आणि ते योग्यरीत्या केले जाईल. आरक्षणाची मर्यादा वाढवावी, हे कायद्याचे जाणकार सांगत नाहीत, तर शरद पवार यांनी हे विधान केले आहे.
कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केले आहे की, ’हा विषय राज्याच्या अखत्यारीतील आहे, केंद्राच्या नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्था कोलमडली नाही. काही ठिकाणी बंद आणि रास्ता रोको झाले, मात्र पोलिसांनी 15 ते 20 मिनिटांत ते रस्ते मोकळे केले.
आपण छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे दाखले देत असताना अशा प्रकारे वागणे म्हणजे कुठेतरी आपण छत्रपतींचा अपमान करतोय का, त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतोय का, असा प्रश्न निर्माण होतो. आंदोलकांकडून अशा प्रकारची अपेक्षा नसल्याचे ते म्हणाले.
महिला पत्रकारांच्या विनयभंगाने आंदोलनाला गालबोट
आंदोलनादरम्यान पत्रकारांवर हल्ला आणि महिला पत्रकारांचा विनयभंग हा प्रकार गालबोट लावणारा आहे. आपण 30 पेक्षा जास्त मराठे मोर्चे, त्यांची शिस्त पाहिली आहे. त्या मोर्चानंतर सरकारने सकारात्मकपणे त्या काळात घेतलेला निर्णयही पाहिला आहे. पत्रकार आपले काम करीत असतात. लोकशाहीत तुमची भावना पोहचवत असताना असा हल्ला होणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारे नाही.
फडणवीस काय म्हणाले?
खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकीय पोळी भाजू नये
महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे असताना मराठा समाजासंदर्भात एकही निर्णय घेतला नाही
शिंदे समितीच्या बैठकीत
कायदेशीर मार्ग काढताना ते न्यायालयात कसे टिकू शकतील,
या विषयावर चर्चा झाली
आम्ही सुरक्षा देऊ, असे सांगितल्याने दुकाने सुरू