लोणी-धामणी : बाजारभाव गडगडल्याने गवार उत्पादक शेतकर्यांचा मजुरी खर्चसुद्धा निघत नसल्याने गवार उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. महिन्यापूर्वी गवारीला प्रतिदहा किलो 1000 ते 1100 रुपये बाजारभाव मिळत होता. आता हाच बाजारभाव दहा किलोस 150 ते 300 रुपयांवर आला आहे. त्यामुळे तोटा सहन करावा लागल्याने शेतकर्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडल्याने शोतकरी हवालदिल झाले आहेत. (Pune Latest News)
कमी पाण्यावर कमी भांडवली खर्चावर कमी दिवसांत चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत गवारीचे उत्पादन घेण्याकडे शेतकर्यांचा कल वाढला असून, जारकरवाडीसह पहाडधरा, पोंदेवाडी, लाखणगाव, देवगाव, धामणी, काढापूर बुद्रुक, वाळुंजनगर, खडकवाडी, रानमळा लोणी, वडगावपीर, मांदळेवाडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवारीचे उत्पादन घेतले जाते. लोणी, धामणी परिसरातील गावांमध्ये शेती ही प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.
या भागात उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असते. त्यामुळे शेतीसाठी पाणी कोठून मिळणार? त्यामुळे या भागातील शेतकरी अनेक वर्षांपासून कमी भांडवलात कमी कालावधीत व कमी पाण्यावर चांगले उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून खरीप हंगामात गवारीची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या सुरुवातीला गवारीची लागवड केली जाते. मात्र, सध्या गवारीचे बाजारभाव कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात आल्याचे मांदळेवाडी येथील गवार उत्पादक शेतकरी संभाजी आदक, फकिरा आदक, बोत्रे यांनी सांगितले.