police pudhari
पुणे

Pune : बंद पोलिस मदत केंद्र अन् गस्तीचा अभाव ; बोपदेव घाट झालाय अतिअसुरक्षित

पुढारी वृत्तसेवा

महेंद्र कांबळे

बंद पडलेले पोलिस मदत केंद्र आणि गस्तीचा अभाव यामुळे अतिअसुरक्षित झालेल्या बोपदेव घाटात सामूहिक बलात्काराचा भयानक प्रकार घडला. मदतकेंद्र असतानाही तेथे कोणी कर्मचारीच नेमलेले नाहीत. मदत केंद्रापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला. त्यामुळे पोलिस यंत्रणेचा हलगर्जीपणाच या घटनेला जबाबदार ठरल्याचे आता बोलले जात आहे.

तीन वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात बोपदेव घाटात पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. त्यापूर्वी प्रेमीयुगलांना, तसेच नागरिकांना भरदिवसा तसेच रात्री हत्यारांच्या धाकाने लुटल्याच्या असंख्य घटना घडल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही घाटातून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावा लागत होता.

हौशी पर्यटक व प्रेमीयुगल पर्यटनाची हौस पूर्ण करण्यासाठी शहरालगतच्या बोपदेव घाट तसेच दिवेघाटाकडे धाव घेताना दिसतात. दिवे घाट, बोपदेव घाट, कात्रज नवीन-जुना बोगदा परिसर या तीन ठिकाणी सुटीसह इतर दिवशी मोठी गर्दी दिसून येते. रात्री उशीरापर्यंत तरूण-तरूणींची वर्दळ या ठिकाणी असते. नेमकी हीच संधी हेरून लुटमार टोळक्यांकडून कधी भरदिवसा तर कधी अंधाराचा फायदा घेत लक्ष करण्यात येत असल्याच्या घटना येथे घडल्या. सर्वात गंभीर प्रकार म्हणजे लुटमार करण्यासाठी टोळक्याकडून महिलांचा देखील वापर केल्याचे काही घटनांवरून समोर आले होते. त्यातच सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे येथे दहशतीचे वातावरण पसरले आहे.

बोपदेव घाट परिसरापासून कोंढवा पोलिस ठाणे लांब असल्याने व मोबाईलच्या नेटवर्कची देखील समस्या उद्ूभवते. काही वर्षांपूर्वी घाटात दिवसभर पोलिसांच्या पेट्रोलिंगची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिसांना वॉकी टॉकीदेखील देण्यात आल्या होत्या. लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस मदत केंद्र हाकेच्या अंतरावरच स्थापन करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांनाही त्वरित मदत मिळण्यास मदत होत होती.

पोलिस मदत केंद्र पुन्हा सुरू होणार का ?

बोपदेव घाटात सामूहिक बलात्काराची घटना घडल्याचे आता समोर आले आहे. या ठिकाणी पोलिसांचे मदत केंद्र आणि पेट्रोलिंगच कमी झाल्याने हा धक्कादायक प्रकार घडण्यास पोलिसांचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचे परिसरातील नागरिक म्हणतात. त्यामुळे आता तरी हे मदत केंद्र सुरू होणार का? अजून अशा घटनांची वाट पाहली जाणार, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

यापूर्वीही दैनिक ‘पुढारी’ वेधले होते लक्ष

रात्रीच्या वेळी घाटात लूटमार करणार्‍या चोरट्यांच्या पथ्यावर पडत होते. त्यामुळे घाटात थांबताय... जरा सांभाळूनच अशी म्हणण्याची वेळ आली होती. वारंवार होणार्‍या घटनांमुळे दैनिक ‘पुढारी’ने घाटात थांबणे पडतंय चोरट्यांच्या पथ्थ्यावर अशा मथळ्याखाली सप्टेंबर 2021 मध्ये वृत्त देऊन पोलिस प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यावेळी एका महिनाभरातच बोपदेव घाटात पोलिस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. मात्र, सध्या ही व्यवस्था बंद झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT