पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती बनविणार्या कारखान्यांमध्ये मूर्तिकार आणि कारागिरांची लगबग सुरू आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला भाविक प्राधान्य देत असल्याने शाडू मातीतील गणेशमूर्तींची मागणी वाढली आहे. तथापि, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीदेखील काही भाविक पसंत करतात. त्यामुळे या गणेशमूर्ती बनविण्याचे कामदेखील सध्या वेगात सुरू आहे.
गणेशोत्सवाला दीड महिन्यापेक्षा अधिक कालावधी उरला आहे. सध्या मूर्तिकार गणेशमूर्ती घडविण्यात व्यस्त आहेत. यंदा रंग, कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ, इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च याचा परिणाम गणेशमूर्तींच्या किमती वाढण्यावर होवू शकतो.
दगडूशेठ गणपती मूर्तीला सर्वाधिक मागणी
पिंपरी-चिंचवड परिसरात दगडूशेठ गणपती या प्रकारातील गणेशमूर्तींना सर्वाधिक मागणी असते. त्या खालोखाल लालबाग गणपती, तसेच सिंहासनावर, पाटावर विराजमान श्रीगणेश आदी मूर्त्यांनाही चांगली मागणी असते. मागणीनुसार गणेशमूर्ती बनवून देण्याकडे बर्याच अंशी कल असतो, अशी माहिती मूर्तिकार अनिल भागवत, शुभम भागवत यांनी दिली.
शाडू मातीच्या मूर्त्या 2700 पर्यंत
घरगुती स्वरुपात दीड ते दोन फुटाच्या गणेशमूर्त्या बनविण्यात येतात. शाडू मातीच्या 2 फुटांतील मूर्त्या या 2200 ते 2700 रुपये या दरात तर, प्लास्टर ऑफ पॅरिसमधील गणेशमूर्त्या 1800 ते 1900 रुपयांमध्ये मिळतील. लाल मातीतील 2 फुटाच्या मूर्त्या 2500 ते 2700 रुपयांपर्यंत मिळतील, अशी माहिती मूर्तिकारांनी दिली.
लाल मातीतील मूर्त्यांना कमी मागणी
शाडू मातीतील गणेशमूर्तीच्या तुलनेत लाल मातीतील गणेश मूर्तींना मागणी कमी असते. शाडू मातीच्या तुलनेत लाल मातीचा दर जास्त असल्याने लाल मातीतील गणेशमूर्त्यांचे दर हे शाडू मातीच्या तुलनेत जास्त असतात, असे मूर्तिकारांकडून सांगण्यात आले.
शाडू मातीच्या पोत्याचे दर वाढले आहेत. त्याचप्रमाणे, इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. गणेशमूर्त्यांसाठी लागणार्या कच्च्या मालाचे दर वाढल्याने गणेशमूर्त्यांचे दर गतवर्षीपेक्षा किमान 10 ते 15 टक्क्याने वाढतील.
– अनिल भागवत, मूर्तिकार
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.