पुणे: राज्य शासनाने पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांपैकी 16 गावांना मोठी भेट दिली आहे. या गावांत सांडपाणी वाहिन्या व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांसाठी (एसटीपी) केंद्र सरकारच्या ‘अमृत 2.0’ योजनेअंतर्गत 533 कोटी 85 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
तर, इतर 7 गावांसाठी 856 कोटी 91 लाख रुपयांचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाला तांत्रिक मंजुरी मिळणे बाकी असून, लवकरच या सर्व गावांमध्ये सांडपाणी व्यवस्थापनाकच्या कामांना गती मिळेल, असा विश्वास महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी व्यक्त केला. (Latest Pune News)
पुण्यात नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांसाठी महापालिका प्रशासनाने सांडपाणी वाहिन्या व प्रक्रिया प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र आराखडे तयार केले आहेत. जुन्या वाहिन्या बदलण्याबरोबरच नव्या वाहिन्यांचे जाळे या गावांत उभारण्यात येणार असून सुमारे 471 कि.मी. लांबीच्या जोडवाहिन्या व 90.5 कि.मी. मुख्यवाहिन्या या अंतर्गत गावांमध्ये टाकण्यात येणार आहेत. तर 7 गावांमध्ये 8 एसटीपी प्रकल्प देखील बांधण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांद्वारे एकूण 201 एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या योजनेसाठी एकूण 1,437 कोटी 94 लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे या प्रकल्पांना तांत्रिक मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
यातील 16 गावांसाठी सांडपाणी वाहिन्यांसाठी 343 कोटी 13 लाख व एसटीपीसाठी 190 कोटी 72 लाख, असे एकूण 533 कोटी 85 लाख रुपयांच्या निधीला सोमवारी अधिकृत मंजुरी मिळाली. नगरविकास विभागाच्या तांत्रिक समितीने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. लवकरच शासन आदेशही जारी होणार असल्याचे आयुक्त राम यांनी सांगितले.
प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेली 7 गावे
बावधन, औताडेवाडी-हांडेवाडी, होळकरवाडी, वडाचीवाडी, वाघोली, शेवाळेवाडी, मांजरी बु. या सात गावांसाठी 856 कोटी 91 लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यामध्ये 950 कि.मी. सांडपाणी
वाहिन्या व 4 एसटीपी प्रकल्प
उभारण्याचे नियोजन आहे. हे प्रकल्प म्हाळुंगे, पिसोळी, नांदेड व गुजर निंबाळकरवाडी येथे होणार आहेत.
या 16 गावांत होणार कामे
सूस, म्हाळुंगे, नर्हे, पिसोळी, सणसनगर, कोंंढवे धावडे, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला, न्यू कोपरे, नांदेड, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी, मांगडेवाडी.