पुणे

पिंपरी : बचत गटांद्वारे सार्वजनिक शौचालयांची सफाई

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील सामुदायिक शौचालयांच्या दैनंदिन साफसफाईचे काम स्थानिक महिला बचत गटांद्वारे केले जात आहे. स्थानिक महिला रहिवाशांकडून चांगल्या प्रकारे शौचालयाची सफाई होत असल्याने त्यांना शहरातील सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांच्या साफसफाईचे कामही देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केला आहे. वस्त्यांमधील शौचालयाची दैनंदिन स्वच्छता व्यवस्थितपणे व्हावी, म्हणून तत्कालीन आयुक्त राजेश पाटील यांनी स्थानिक महिला बचत गटांना दैनंदिन साफसफाईचे काम देण्याचा निर्णय घेतला.

'नवी दिशा' उपक्रमाअंतर्गत सुरू झालेला हा मोहिमेस महिला बचत गटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शौचालयाच्या एका सीटसाठी दरमहा 900 रुपये खर्च पालिका देत आहेत. तसेच, स्वच्छतेसाठी अ‍ॅसिड, फिने, खराटे, पाणी तसेच, वीजपुरवठा पालिका करीत आहे. शौचालयाच्या किरकोळ दुरुस्ती कामासाठी सहा महिन्यांसाठी 5 हजार रुपये देण्यास नव्याने सुरुवात करण्यात येत आहे.

आतापर्यंत शहरातील विविध 30 महिला बचत गटांना एकूण 37 सामुदायिक शौचालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात एकूण 546 सीट आहेत. प्रत्येक सीटची दिवसांतून चार वेळा स्वच्छता करण्याची अट आहे. बचत गटांच्या महिलांकडून चांगल्या प्रकारे स्वच्छता राखली जात आहे. तसेच, शौचालयातील दरवाजे तोडफोडीच्या घटनाही कमी झाल्या आहेत. बचत गटांच्या आवाहनाला रहिवाशीही प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे सर्वच शौचालये स्वच्छ झाल्याचा दावा आरोग्य विभागाकडून केला जात आहे.

हा उपक्रम यशस्वी झाल्याने शहरातील बाजारपेठा, मंडई, चौक व रस्त्यांवर असलेल्या सार्वजनिक शौचालय व स्वच्छतागृहांच्या साफसफाईचे काम ठेकेदारांना न देता या महिला बचत गटांना देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. तसेच, धूरफवारणी अशी आरोग्य विभागाची कामेही त्यांना देण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे शौचालय व मुतार्‍या नियमितपणे स्वच्छ राहतील. बचत गटांना रोजगारही उपलब्ध होणार आहे, असे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे पालिकेच्या खर्चातही बचत होईल.

नासधूस करणार्‍यांविरोधात पोलिसांत तक्रार सामुदायिक शौचालयाची नासधूस करण्याचे प्रकार सातत्याने होतात. त्यामुळे साफसफाई कामास अडथळा निर्माण होऊन अस्वच्छता पसरते. महिला बचत गटांना साफसफाईचे काम दिल्यानंतर असे प्रकार कमी झाले आहेत. एका शौचालयात नासधूस करणार्‍याविरोधात पोलिस तक्रार देण्यात आली. गुन्हा दाखल होत असल्याने आणि आपल्या भागातीलच महिला स्वच्छता करीत असल्याने नासधूस व अस्वच्छतेचे प्रकार कमी झाल्याचे सकारात्मक चित्र आहे.

महिला बचत गटांद्वारे साफसफाईच्या कामास प्राधान्य देणार : उपायुक्त अजय चारठाणकर
नवी दिशा या उपक्रमाअंतर्गत महिला बचत गटांना सामुदायिक शौचालयाची दैनंदिन साफसफाईचे काम देण्यात आले आहे. त्यासाठी गटांचा प्रतिसाद वाढत आहे. स्थानिक गट असल्याने त्या शौचालयाची देखरेखही करतात. परिणामी, शौचालये स्वच्छ राहत आहेत. या पद्धतीने सामुदायिक शौचालयाची स्वच्छता चांगली राहत असल्याने सार्वजनिक शौचालये व मुतार्‍या साफसफाईचे कामही त्यांना देण्याचा विचार सुरू आहे. त्यातून महिला बचत गटांचे स्वावंलबन होत आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर यांनी सांगितले.

शहरात एकूण 690 शौचालये
शहरात एकूण 690 सामुदायिक व सार्वजनिक शौचालये आहेत. त्यात एकूण 5 हजार 220 सीट आहेत. सर्वाधिक 230 शौचालये अ क्षेत्रीय व 105 शौचालये फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत आहेत. क मध्ये 93, ह मध्ये 87, ब मध्ये 72, ग मध्ये 65, ड मध्ये 23, ई मध्ये 15 शौचालये आहेत. तर, शहरात एकूण 299 सार्वजनिक स्वच्छतागृहे असून, त्यात 1 हजार 319 सीट आहेत.

SCROLL FOR NEXT