पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रिकेट खेळताना आठवीतील एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. वानवडी भागात ही घटना घडली असून, आठवीतील मुलाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली. वेदांत शिवाजी धामणगावकर (वय 14, रा. विकासनगर, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. वेदांत एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत आठवीत शिक्षण घेत होता. शाळेला आठवड्यापूर्वी सुटी लागली. गुरुवारी सकाळी तो मित्रांबरोबर क्रिकेट खेळायला गेला होता. त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याने वडिलांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. वेदांतला तातडीने वानवडीतील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले. फातिमानगर परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.