पुणे: राज्यात अकरावी प्रवेशासाठी शेवटची फेरी राबविण्यास सुरुवात झाली असली, तरी प्रवेशासाठी तब्बल 8 लाख 76 हजार 648 जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा तब्बल पावणेनऊ लाखांहून अधिक जागा रिक्तच राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 535 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 11 हजार 340 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 43 हजार 352 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध आहेत. (Latest Pune News)
त्यासाठी 14 लाख 71 हजार 747 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 13 हजार 475 विद्यार्थ्यांनी कॅपमधून, तर 1 लाख 64 हजार 569 विद्यार्थ्यांनी कोटा अंतर्गत अशा 12 लाख 78 हजार 44 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आता प्रवेशासाठी अद्यापही 6 लाख 97 हजार 865 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 78 हजार 783 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 76 हजार 648 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात अकरावीच्या प्रवेशासाठी आता शेवटची फेरी 22 ते 30 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार असून, अद्यापही ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी या फेरीत आपला प्रवेश निश्चित करावा, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.
25 ऑगस्टला प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात येणार आहेत. 26 आणि 27 ऑगस्टला आत्तापर्यंतच्या फेर्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावीचा भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे. दि. 29 ऑगस्टला संबंधित फेरीसाठी प्रवेश जाहीर करण्यात येणार असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 29 आणि 30 ऑगस्टला प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.