पुणे: अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरण्यास सुरुवात होऊन अवघे चार दिवस झाले असले तरी अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, केवळ चार दिवसांत तब्बल एक लाख 10 हजार 221 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला असल्याचे स्पष्ट झाले आहे. पात्रताधारक विद्यार्थ्यांना 30 एप्रिलपर्यंत नोंदणी करून अर्जाचा भाग एक भरता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता अकरावी प्रवेशासाठी यंदाही राज्यस्तरावर ऑनलाइन केंद्रिभूत प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. शिक्षण विभागातर्फे विद्यार्थ्यांना दि. 10 एप्रिलपासून नोंदणी करण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यापूर्वी केवळ महत्त्वाच्या महापालिकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांत इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशपरीक्षा घेतली जात होती; परंतु गेल्या शैक्षणिक वर्षापासून राज्यस्तरावर एकाच संकेतस्थळाच्या माध्यमातून ही केंद्रिभूत ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे.
यंदा राज्यातील 9 हजार 551 महाविद्यालयांनी नोंदणीसाठी सहभाग घेतला आहे. एकूण जागांची उपलब्धता अद्याप उपलब्ध करण्यात आली नसली तरी, अंदाजे 22 लाखांहून अधिक जागा अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना नोंदणी करून त्यांची प्राथमिक माहिती नोंदविता येणार आहे. यात विद्यार्थ्यांची वैयक्तिक माहिती, तसेच आरक्षणासाठीचा प्रवर्ग, शाळेचे नाव व इतर तपशीलाचा समावेश आहे. नोंदणीला सुरुवात होताच, राज्यस्तरावर अर्ज दाखल करण्यासाठी लगबग पाहायला मिळाली. सध्याच्या वेळापत्रकानुसार नोंदणीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत असेल.
प्रवेश प्रक्रियेत अर्जाचा दुसरा भाग महत्त्वाचा...
प्रवेशाच्या प्रक्रियेत अर्जाचा भाग दोन अतिशय महत्त्वाचा असतो. यात विद्यार्थ्यांनी त्यांना प्रवेश घ्यायच्या शाखा व महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवायचा असतो. त्यांचा पसंतीक्रम व मिळालेले गुण यांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्याआधारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. सध्या अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू असून, निकालानंतर विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना हीींंीि:/// ारहरषूक्षलरवाळीीळेपी. ळप या संकेतस्थळाला भेट देता येईल.