बारामती: बारामती शहरातील रुई भागात दोन गटांत जोरदार मारामारी झाली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
गजानन देविदास शिंदे (रा. जामदार रोड, बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेंद्र काजळे, सागर काजळे, कुंदन काजळे (रा. तांदूळवाडी, बारामती) व हेमंत भिसे (रा. सावळ, ता. बारामती) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Pune News)
दि. 24 रोजी रात्री 11.50 वाजता रुई गावच्या हद्दीत पालखी महामार्ग पुलाच्या पुढे हा प्रकार घडला. आरोपींनी फिर्यादीची गाडी आडवून शिवीगाळ करत गाडीतून उतरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी गाडीमध्ये माझी गरोदर पत्नी आहे, असे सांगितले. त्यावर सागर काजळेने मी बारामतीचा भाई आहे, असे सांगत शिंदे यांना गाडीतून ओढून मारहाण केली.
त्यावेळी सुरेंद्र काजळेने कोयता उलट्या बाजून शिंदे यांच्या डोक्यात मारून दुखापत केली. कुंदन काजळेने रॉड खांद्यावर मारून दुखापत केली. हेमंत भिसे व दोन अनोळखी इसमांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच ठार मारण्याची धमकी दिली. फिर्यादीची पत्नी सायली शिंदे यांनी नवर्याला मारू नका असे सांगितले असता त्यांनाही शिवीगाळ, दमदाटी करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुस-या बाजूने सुखसागर सुनील काजळे (रा. तांदूळवाडी, कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन शिंदे (रा. कसबा, बारामती), रवी गुटाळ, शुभम ठाकूर, वैभव क्षीरसागर (रा. रुई, बारामती) व अन्य तीन अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी कामगार हेमंत रतीलाल भिसे यांना घरी सोडून रूई पाटी येथे जात असताना आरोपी गजानन शिंदे व त्यांच्या सोबतच्या अन्य लोकांनी गाडी थांबवली. गजानन शिंदे याने शिवीगाळ करत फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला. सोबतच्या रवी गुटाळ, शुभम ठाकूर, वैभव क्षीरसागर व अन्य तिघांनी फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला.
तसेच मारहाण करत दुचाकीचे नुकसान केले. फिर्यादी दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. कोयता, दगडाने त्यांची गाडी चेंबवण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.