पुणे

सोमेश्वरनगर : ‘सोमेश्वर’च्या सभेत सभासद-सत्ताधार्‍यांमध्ये खडाजंगी

अमृता चौगुले

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या 58 व्या वार्षिक सभेत सभासदांनी सत्ताधार्‍यांना विविध विषयांवर धारेवर धरले. शिक्षण संस्थेसाठी भागविकास निधी अंतर्गत ऊस बिलातून प्रतिटन 50 रुपये निधी कपात करण्यास मंजुरी देण्यात आली. शिक्षण संस्थेच्या कारभारावर मात्र सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दर्जा सुधारण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत, अशी मागणी केली.

सोमेश्वरची वार्षिक सभा अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर गुरुवारी (दि. 29) पार पडली. या वेळी सोमेश्वरचे उपाध्यक्ष आनंदकुमार होळकर, जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांच्यासह सर्व संचालक मंडळ, माजी अध्यक्ष शहाजीराव काकडे, राजवर्धन शिंदे, सभापती प्रमोद काकडे, शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे, ज्येष्ठ नेते रघुनाथ भोसले, तुकाराम जगताप, माणिकराव झेंडे, सुदाम इंगळे, दिलीप फरांदे, रमाकांत गायकवाड यांच्यासह अधिकारी, सभासद उपस्थित होते.

दहा गावे माळेगावला जोडणे, 50 रुपये भागविकास निधी कपात करणे, निर्लिखित रकमा, ऊस दर, एकरकमी एफआरपी, कामगार पगार, शिक्षण संस्था, बायोगॅसमधील तोटा, शेअर्स वाढ यावर जोरदार चर्चा झाली. सभेत 5 कोटीपेक्षा अधिक रकमा कपात केल्याबद्दल सभासद पी. के. जगताप, कांचन निगडे, अ‍ॅड. बाळासाहेब गायकवाड, शंकरराव दडस यांनी संचालक मंडळाला धारेवर धरले. यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी या रकमा 1992 ते 2015 पर्यंतच्या जुन्या असून त्या अस्तित्वात नसल्याने वसूल करण्यास अडचण येत असल्याचा खुलासा केला. बाळासाहेब राऊत यांनी जळालेल्या उसाबाबत व ऊस बाहेरच्या कारखान्याला गेल्याचे मत व्यक्त केले.

सतीश काकडे यांनी 100 रुपये उसाला दर वाढवून देण्याची मागणी केली. डिस्टलरी व सहवीज निर्मिती होणार असल्याने कारखान्यावर 300 ते 350 कोटी रुपये कर्ज होणार असल्याचे सांगत जादा झालेल्या रकमेवर मंजुरी घेणे सभासदांच्या अहिताचे असून एफआरपीवर पैसे मिळणार नसल्याचे सांगितले. एकरकमी एफआरपी देण्याची मागणी करत सतीश काकडे यांनी प्रसंगी जेलमध्ये जाण्याची तयारी दाखवली. कारखान्यावर 148 कर्ज असून सहकार कायद्यानुसार कलम 88 नुसार चौकशी लावण्याचे संकेत दिले.

सोमेश्वर शिक्षण संस्थेच्या इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे शरदचंद्र पवार असे नामकरण केले आहे. त्यास कारखान्याचे संस्थापक कै. मुगटराव काकडे अथवा सोमेश्वरचे नाव द्यावे, अशी मागणी सतीश काकडे यांनी दिली. पी. के. जगताप यांनी मागील ऑनलाइन सभा बेकायदेशीर असल्याची टीका केली. यावर पुरुषोत्तम जगताप यांनी त्यास विरोध करत हे सिध्द करण्याची मागणी केली. दिलीप गिरमे यांनी नवीन सभासद करून घेण्याची तर धैर्यशील काकडे यांनी उशिरा विस्तारीकरण झाल्याने सभासदांचे नुकसान झाल्याचे मत मांडले.

कोर्‍हाळे खुर्दचे सरपंच गोरख खोमणे यांनी ओढ्याचे व निरा नदीचे प्रदूषण थांबवा, अशी सूचना केली. यावर अध्यक्ष यांनी हे पाणी कारखान्याचे नसून प्रदूषण होत नसल्याचे सांगितले. सभासद भाऊसाहेब हुंबरे, सतीश सकुंडे, शिवाजी शेंडकर यांनी शिक्षण संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विक्रम भोसले यांनी 1 कोटी रुपयाने शिक्षण संस्था फायद्यात असल्याने निधी कपातीचा प्रस्ताव मांडला. सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सभासदांच्या प्रश्नाला सविस्तर उत्तर दिले.

कपातीची रक्कम इमारत व सुविधांसाठी
शिक्षण संस्था सभासदांसाठी कार्यरत असून ऊस बिलातून व पवार कुटुंबाच्या वतीने 39 कोटी रुपये मिळाले असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले. विद्यार्थी फीमधून कर्मचार्‍यांचे पगार होत असल्याचे सांगत कपातीचा निधी इमारती व त्या ठिकाणी लागणार्‍या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरत असल्याचे जगताप यांनी सांगितले.

ऊस दर 3273 रुपयांवर जातोय
मदन काकडे यांनी 3273 रुपये या वर्षीचा दर बसत असल्याचे सांगत 3020 रुपये दर दिल्याचा आरोप केला. बायोगॅस प्लँटमधून 1 कोटी 88 लाख नुकसान झाल्याचे सांगितले. कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी त्यांच्या मुद्यावर खुलासा केला. ऊस पुरवठा खर्च वाढला असून बगॅस डायरसाठी 11 लाख भाडे दिल्याचे स्पष्ट केले. विस्तारीकरणाचा प्रकल्प 87 कोटींचा प्रकल्प विलंब केल्याने 115 कोटींवर गेल्याचे सांगितले. तोडणी व वाहतूक खर्च माळेगावपेक्षा जास्त होत असल्याचा आरोप केला.

काकडे यांच्याकडून सचिव धारेवर
सतीश काकडे यांनी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे यांना धारेवर धरत शिक्षक संस्थेची सभा वेगळी घेण्याची मागणी केली. शिक्षण संस्थेचा दर्जा, कर्मचार्‍यांचे पगार याबाबत सवाल विचारले. नॅक मूल्यांकन करून घ्यावे, असा सल्ला देत यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

सोमेश्वरच्या कारखान्याचे डिस्टलरीचे विस्तारीकरण करण्यासाठी 114 कोटींची गुंतवणूक आवश्यक आहे. त्यापैकी 34 कोटी रुपये स्वनिधी उपलब्ध करावा लागणार आहे. सभासदांच्या परतीच्या ठेवीतून 10 कोटी स्वनिधी उपलब्ध झाला आहे. तर 24 कोटी रुपये उभे करण्यासाठी 13 हजार 69 शेअर्स सभासदांमधून उभारावे लागणार आहेत. अन्य कारखान्याच्या बरोबरीने स्पर्धात्मक दर देण्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे.

                                        – पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर कारखाना.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT