पारगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: अज्ञात वाहनाच्या धडकेने उदमांजर ठार झाल्याची घटना वळती (ता. आंबेगाव ) येथे गुरुवारी ( दि.२६ ) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
वळती ते काटवानवस्ती रस्त्यावर लोखंडे वस्तीच्या अलीकडे उदमांजर रस्त्यात पडले होते. संतोष शेवाळे यांनी आपली दुचाकी थांबवून पाहीले तर ते मृतावस्थेत होते. सध्या या परिसरात उसाची तोड वेगात सुरू आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचा आधीवास दिवस संपला आहे. या परिसराची बिबट प्रवण क्षेत्र म्हणून ओळख आहे. वळती गावाला मोठे वनक्षेत्र लाभले आहे. येथे बिबट्याप्रमाणेच कोल्हे, लांडगे, उदमांजर, खवले मांजर, रानमांजर हे वन्यप्राणी मोठ्या संख्येने आढळून येतात. आता उसतोडीमुळे त्यांचा अधिवास संपल्याने ते मनुष्यवस्तीत येऊ लागले आहेत. उदमांजर हे जंगलात बीळे करून त्यात राहतात. उंदीर, छोटे प्राणी, पक्षी हेच त्यांचे खाद्य आहे. ते रात्रीच्या वेळीच बाहेर पडतात.