बाणेर (पुणे ) : पुढारी वृत्तसेवा : बाणेर येथील मोहननगर परिसरात आठवड्यातून तीन दिवस आठवडे बाजार भरतो. मोहननगरच्या मुख्य रस्त्याला लागूनच हा बाजार भरत असल्यामुळे विक्रेते रस्त्यावर दुकाने थाटत आहेत. यामुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जात आहे. त्यातच बाजारात येणारे ग्राहकदेखील रस्त्यावर वाहने उभी करीत आहेत. यामुळे या रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्याच्या कडेला असणार्या इमारती समोर स्थानिक व्यावसायिकांनी पाणीपुरी, भेळ, चहा, स्नॅक सेंटर यांसारखे पथारीवाले आपला व्यवसाय अतिक्रमण करून थाटतात. त्यामुळे इथे येणारे खवय्ये रस्त्याच्या बाजूला कशी ही वाहने उभी करून या ठिकाणी ये-जा करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. परिणामी, या रस्त्यावरून ये-जा करताना वाहनचालक व नागरिकांची दमछाक होत आहे. मुंबई-बंगलूर महामार्गाला लागूनच बाणेर येथील बिटवाईज या कंपनीकडून एक रस्ता पुढे मोहननगर परिसर जातो. हा रस्ता सुस, नांदे, लवळे, मुळशी या भागाला जोडणारा महत्त्वपूर्ण रस्ता असल्यामुळे येथे नेहमीच रहदारी असते.
सध्या येथील रहिवासी वाहतूक कोंडीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. या सर्व व्यावसायिकांमुळे अर्ध्यापेक्षा कमी रस्ता फक्त रहदारीला वापरण्याइतका राहतो. याकडे वारंवार तक्रार करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
आठवड्यातून तीन वेळा एकच रस्त्यावर बाजार कोणाच्या आशीर्वादाने चालत आहे, असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. येथे येणारे ग्राहक पदपथाला लागूनच तीन रांगेमध्ये दुचाकी व त्यानंतर चार चाकी उभी करतात. त्यामुळे येथे कसेबसे रस्त्यावरून एकच वाहने ये-जा करू शकतात. सोसायटीमध्ये राहणार्या नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने हा प्रश्न त्वरित सोडवावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. भाजी विक्रेते व्यावसायिक रस्त्याचा जवळपास अर्धा भाग व्यापतात. तसेच, दुकानांत येणारे ग्राहकही रस्त्यावर वाहनांचे पार्किंग करीत आहेत. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
– दिलीप कळमकर, रहिवासी, मोहननगर
आठवडे बाजाराला आमच्याकडून कोणत्याही प्रकारची परवानगी नाही. या बाजारांवर याआधीही कारवाई करण्यात आली आहे व पुढेही कारवाई करण्यात येईल. तसेच दुकानासमोरील अतिक्रमणांवरही कारवाई करण्यात येईल.
-संदीप खलाटे, सहायक आयुक्त, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.